कार्यालयांना भंगार वस्तूंचा विळखा; साहित्यांवर औषधांचा फवारा; लिलावाला अल्प प्रतिसाद

शहरात रस्त्यांवर पडलेली बेवारस वाहने तसेच भंगार साहित्य उचलण्याची व्यापक मोहीम महापालिकेकडून स्वच्छता अभियानात चौदा वर्षांपूर्वी राबवण्यात आली. मात्र त्यानंतर अशाप्रकारची मोहीमच शहरात झालेली नाही. महापालिकेच्या अनेक कार्यालयांमध्येच हातगाडय़ा, जुन्या गाडय़ा आणि स्टॉलचा खच पडला आहे.

चौदा वर्षांपूर्वी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियाना अंतर्गत महापालिकेने उत्स्फूर्तपणे बेवारस वाहने आणि भंगार साहित्य उचलण्याची मोहीम राबविली. पण त्या मोहिमेचाच महापालिकेला विसर पडला आहे. त्यामुळे विविध कारणांनी जप्त करण्यात आलेली वाहने, बेकायदेशीर स्टॉल, हातगाडय़ा, अन्य साहित्य आणि भंगार साहित्य क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पडून राहिले आहे.

शहरातील गल्लीबोळात तसेच प्रमुख चौकात बेवारस वाहने आणि भंगार साहित्य मोठय़ा प्रमाणावर पडून सातत्याने दिसून येते. त्यातून शहराचे विद्रूपीकरणही होत असून गणेशोत्सवाच्या कालावधीत बेवारस वाहने उचलण्याची मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. तीन ते चार दिवसांसाठी ही मोहीम राबविली गेली पण तिचे पुढे काय झाले, याची माहिती महापालिकेकडे नाही. चौदा वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त टी. सी. बेंजामिन यांनी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात वाहने तसेच रस्त्याच्या कडेला पडलेले अनावश्यक साहित्य उचलले होते. त्यानंतर अशा प्रकारची मोहीम हाती घेण्यात आली नाही.

अतिक्रमण विभागाकडून कारवाई करताना हातागाडय़ांसह अन्य काही साहित्य जप्त केले जाते.

ते साहित्य सोडवून घेण्यासाठी फेरीवाले आणि विक्रेत्यांना काही तासांची मुदत असते. त्या कालावधीत जप्त केलेले साहित्य सोडविले नाही तर ते अतिक्रमण विभागाकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयांमध्येही हातगाडय़ा आणि जुन्या गाडय़ांचा खच पडला आहे. वर्षांनुवर्षे तशाच पडलेल्या या साहित्याचा लिलाव महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो,मात्र त्यालाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. अनावश्यक साहित्य, भंगार, जुन्या गाडय़ा आवारातच पडल्यामुळे अस्वच्छतेबरोबरच नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..

  • ढोले-पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या भंगार सामानाचा खच.
  • काही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रामुख्याने हातगाडय़ांपासून मारूती व्हॅन गाडय़ा पडलेल्या आहेत.
  • शहरातील छोटय़ा विक्रेत्यांचे नानाविध प्रकारचे साहित्य क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पडून.
  • कुंभारवाडय़ाजवळ असलेल्या जन्म-मृत्यू कार्यालयाजवळ तुटलेल्या फळ्या, टायर्स अशा सामानाचा ढीग.

डासांचे औषध फवारू; पण भंगार उचलणार नाही!

पडीक वस्तूंमध्ये पाणी साठून डासांची वाढ होण्याची शक्यता मोठी असते. मुकुंदनगरसारख्या काही ठिकाणच्या नागरिकांकडून तशा तक्रारीही आल्या आहेत. या सामानाची जोपर्यंत विल्हेवाट लावली जात नाही तोपर्यंत त्यावर दर सात दिवसांनी डास अळीनाशक औषधाची फवारणी करावी लागते. त्याप्रमाणे अनेक ठिकाणी महापालिकेकडून साठून राहिलेल्या भंगार मालावर औषधांची फवारणी केली जाते. दुसरीकडे या सामानाच्या विल्हेवाटीचे काम मात्र रखडत असल्याचे दिसून येते. औषध फवारणीचे अतिरिक्त काम करू; पण भंगार उचलणार नाही, हा महापालिकेचा अजब खाक्या नागरिकांना बुचकळ्यात टाकणारा आहे.

डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या मोठी

ऑक्टोबरमध्ये चिकुनगुनियाचे ८४५ रुग्ण सापडले आहेत, तर डेंग्यूच्या ४५६ संशयित रुग्णांचीही याच कालावधीत नोंद झाली आहे. संगमवाडी, ढोले- पाटील रस्ता आणि घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण सर्वाधिक सापडले आहेत, तर संगमवाडीबरोबरच ढोले-पाटील रस्ता व भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागात चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

Story img Loader