करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या उपप्रकारामुळे जगाच्या काही भागात वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असली तरी भारतातील रुग्णसंख्येत अद्याप मोठे बदल दिसत नाहीत ही सकारात्मक बाब आहे. पुणे शहरातही अद्याप करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या संपूर्ण नियंत्रणात आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र, हे चित्र बदललेच तर नायडू रुग्णालयासह महापालिकेची सर्व रुग्णालये परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहेत, असा निर्वाळा पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
ओमायक्रॉन या करोनाच्या प्रकारामुळे २०२२ च्या सुरुवातीला करोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या करोना लाटेच्या तुलनेतही ओमायक्रॉनमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेमध्ये करोना रुग्णांची संख्या कित्येक पटीने अधिक होती. रुग्णांची संख्या जास्त असली तरी यांपैकी बहुसंख्य रुग्ण हे घरच्या घरी उपचार घेऊन बरे झाले. काही मोजक्या रुग्णांना रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज भासली. ओमायक्रॉनमुळे वाढलेली रुग्णसंख्या दीर्घ काळ कायम राहिली तरी गेल्या दोन महिन्यात ती नियंत्रणातही आली. सध्या पुणे शहरासह राज्यात रुग्णांची संख्या पूर्णपणे आटोक्यात आहे.
हेही वाचा >>> करोना प्रतिबंधासाठी पालिका सज्ज; रुग्णालयांतील सुविधांचा आढावा
पुणे महापालिकेचे साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले,की महापालिका कार्यक्षेत्रात सध्या ३५ सक्रिय रुग्ण आहेत. यांपैकी एकही रुग्ण रुग्णालयात किंवा अतिदक्षता विभागात दाखल नाही. सोमवारी (२६ डिसेंबर) अवघ्या एका नव्या रुग्णाला करोना संसर्गाचे निदान झाले आहे. ही आकडेवारी शहरातील करोनाचे चित्र पुरेसे स्पष्ट करणारी आहे.
परदेशातील रुग्णवाढ काळजीचे कारण असली तरी तेथील लोकसंख्येने घेतलेली लस आणि येथील लोकसंख्येने घेतलेली लस यांच्या परिणामकारकतेत मोठा फरक आहे. त्यामुळेच बीएफ.७ चा धोका उद्भवेल असे वाटत नाही, मात्र काही प्रमाणात रुग्णवाढ झाली तर परिस्थिती हाताळण्यास नायडू रुग्णालयासह महापालिकेची सर्व रुग्णालये सक्षम आहेत, हे डॉ. वावरे यांनी स्पष्ट केले.