पुणे : महानगरपालिकेच्या मिळकत कराची रक्कम न भरणाऱ्यांच्या विरोधात पालिकेने कारवाई सुरू केली आहे. महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी असलेल्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून वसुलीसाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतदारांना नोटीसा देऊन त्यांच्याकडून वसुली करण्याचे नियोजन पालिकेने सुरू केले आहे.
मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या बँड पथकाच्या माध्यमातून चार दिवसांत ११ कोटी १९ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. यापुढेही मोहीम सुरू राहणार आहे. मिळकतकर विभागाकडे आतापर्यंत शहरातील आठ लाख ७३ हजार २५७ मिळकतदारांनी १८०० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे.
होही वाचा…जावयाकडून सासूरवाडीतील घर जाळण्याचा प्रयत्न,कोथरुड भागातील घटना; जावयाविरुद्ध गु्न्हा
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मिळकत कर विभागाकडे पाहिले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात मिळकत कर विभागाला २७०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत १८०० कोटी रुपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले आहे. महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पालिका हद्दीतून वगळून तेथे नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच, या गावातून मिळकत कर वसूल न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळे या गावातून मिळणरे २५० ते ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होणार आहे, अशी माहिती मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
ज्या मिळकतदारांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यांना पालिकेच्या वतीने नोटीस बजावली आहे. नोटीस देऊनही कर न भरणाऱ्यांकडून मिळकतकराच्या वसुलीसाठी पालिकेने बँड पथक नेमले आहे. हे पथक थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन बँड वाजविते. एक डिसेंबरपासून बँड पथकाच्या माध्यमातून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोठी थकबाकी असतानाही ती न भरणाऱ्या २३ मिळकतींवर कारवाई करून पालिकेने त्या जप्त केल्या आहेत. थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी बँड पथकांबरोबरच मिळकतकर विभागाकडून स्वतंत्र पथके देखील नेमण्यात आल्याचे उपायुक्त जगताप यांनी स्पष्ट केले.
होही वाचा…व्यायाम शाळेतून घरी येताच संगणक अभियंत्याचा मृत्यू; कुस्तीगिराच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी घटना
पुणे महापालिका हद्दीतील एकूण मिळकती – १४ लाख ८० हजार मिळकतकर भरलेल्या मिळकती ८ लाख ७३ हजार थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवून मिळकतकराची वसुली केली जात आहे. आतापर्यंत विविध माध्यमांतून १८०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यात यश आले आहे. उर्वरित उद्दिष्टदेखील पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. माधव जगताप, उपायुक्त, मिळकत विभाग