पुणे : ‘संरक्षण विभागाच्या हद्दीत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्याने पावसाळ्यात तेथील पाणी महापालिकेच्या नागरी भागात येते आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो. गेल्या वर्षीदेखील असे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेला संरक्षण विभागाच्या हद्दीत पावसाळापूर्व कामे करण्यासाठी परवानगी द्यावी,’ अशी मागणी महापालिका प्रशासनाने संरक्षण विभागाकडे केली आहे.
संरक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांच्यात नुकतीच याबाबत बैठक झाली. त्यामध्ये यावर चर्चा झाल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. गेल्या वर्षी पावसाळ्यात शहरातील २०१ ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेल्या येरवड्यातील आंबेडकर सोसायटीतून बीईजीच्या परिसरात जाणाऱ्या नाल्याचा प्रवाह बंद केल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते.
धानोरी येथील लक्ष्मीनगर सोसायटीत संरक्षण विभाग ग्रेफ सेंटर परिसरातील चऱ्होली डोंगरावरून पाणी येत असल्याने वाहतूक आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. याबरोबरच पावसाळ्यात पाषाणमधील संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेल्या जागांमधून आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) परिसरातून बाणेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ही समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाच्या हद्दीत आवश्यक ते काम करणे गरजेचे आहे, ही बाब महापालिकेकडून संरक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. त्याला संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
संरक्षण विभागाच्या हद्दीत आवश्यक ती पावसाळ्यापूर्वीची कामे झाल्यास पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती रोखण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संरक्षण विभागाकडे कामे करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. संरक्षण विभागाच्या हद्दीत चार ठिकाणी ही परवानगी मागण्यात आली आहे. पृथ्वीराज बी. पी. (अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका)