पुणे : नागरिकांच्या सोयीसाठी खासदार निधीतून दोन कोटी रुपये खर्च करून शहरातील विविध भागांत उभारण्यात आलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या अत्याधुनिक शौचालयांवर (ई-टॉयलेट) पुन्हा खर्च करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ई टॉयलेटची पुन्हा तोडफोड होऊ नये, तसेच त्यातील साहित्याची चोरी होऊ नये, यासाठी त्यांच्या जागादेखील बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून शहरात ११ ठिकाणी ई-टॉयलेट उभारण्यात आली होती. यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या महिलांना याचा उपयोग व्हावा, या उद्देशाने याची उभारणी करण्यात आली होती. जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, सेनापती बापट रस्ता, विमाननगर, वाडिया महाविद्यालयाजवळ, नीलायम पूल अशा महत्त्वाच्या ठिकाणी ही ई-टॉयलेट ठेवण्यात आली होती.

पहिल्या वर्षभरासाठी याच्या देखभाल-दुरुस्तीचे काम एका खासगी कंपनीकडे देण्यात आले होते. मात्र, याची मुदत संपल्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने यातील बहुतांश टॉयलेट बंद अवस्थेत असल्याचे उघडकीस आले होते. या अद्ययावत टॉयलेटच्या काही भागांची चोरी झाल्याचेही लक्षात आले.

ही शौचालये पुन्हा वापरात यावीत, यासाठी यामध्ये दुरुस्ती करून त्यांच्या जागा बदलण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नागरिकांची वर्दळ असलेल्या, तसेच महापालिकेचे सुरक्षारक्षक २४ तास तैनात असतात, अशा ठिकाणी आता ई-टॉयलेट बसवली जाणार आहेत. याच्या दुरुस्तीसाठी निविदादेखील काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोट

नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेटचा वापर नागरिकांकडून व्हावा, यासाठी त्याच्या जागांमध्ये बदल केला जाणार आहे. याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच याचा वापर नागरिकांना करता येईल. संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे महापालिका