पुणे : एक संगीतकार जाताना मागे काय ठेवतो, तर ते त्याचे सूर! ते ज्यावर उमटले, ते वाद्य त्याला त्याच्या हयातीत किती प्रिय असेल, हे निव्वळ कल्पनातीत. संगीतकाराच्या चालीचा पहिला श्रोता बनून, त्याच्या प्रतिभेचे अलंकार अंगाखांद्यावर वागविणाऱ्या या वाद्याचे पैशांत मोल करता येत नाही; कारण ते केवळ वाद्य नाही, तर त्या काळाचे, त्या काळातील संगीताचे संचित असते. त्यातून ते रामचंद्र नरहर चितळकर अर्थात सी. रामचंद्र यांचे असेल, तर किती अमोल, याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडावेत. ज्या पियानोवर चितळकरांनी चाली रचल्या, ज्यावर सरगम छेडताना ते तल्लीन झाले, जो पियानो अगदी अलीकडे नव्या पिढीतल्या काही भाग्यवान सूरसाधकांनाही त्याच्यावर बोटे फिरवू देत होता, तो रविवारी पुण्यातल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयात दाखल झाला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सी. रामचंद्र यांचे निधन झाल्यावर हा पियानो, त्यांच्या इच्छेनुसार ज्येष्ठ सॅक्सोफोन व क्लॅरिनेटवादक सुरेश यादव यांच्याकडे सी. रामचंद्र यांच्या पत्नी बेन यांच्याकडून सुपूर्द करण्यात आला होता. या पियानोचा स्वत:च्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे चार दशके सांभाळ करणारे यादव यांनी रविवारी तो केळकर संग्रहालयाला दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. यादव यांचा १९७५ पासून सी. रामचंद्र यांच्या वाद्यवृंदात सॅक्सोफोन आणि क्लॅरिनेटवादक म्हणून सहभाग होता. त्यांचा आणि सी. रामचंद्र यांचा पुढे गाढ स्नेहबंध जुळला. ‘याच आपलेपणातून अण्णांनी, त्यांचा हा लाडका पियानो त्यांच्या पश्चात माझ्या पत्नीला देण्याची इच्छा त्यांच्या आजारपणाच्या काळात व्यक्त केली होती. त्यानुसार, तो आमच्याकडे आला,’ असे यादव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

ते म्हणाले, ‘अण्णा हा पियानो स्वत: वाजवायचे, त्यावर गायचे, हे मला जवळून अनुभवता आले. पियानो आमच्या घरी आल्यावर त्याला आम्ही जीवापाड जपले. त्याची रोज पूजा केली. माझी मुलेही त्यावर शिकली. मधल्या काळात अनेकांनी मोठ्या रकमा देऊन पियानो खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. पण, अण्णांनी मला अतिशय विश्वासाने दिलेला हा पियानो मी असा देऊच शकत नव्हतो. मात्र, अलीकडे मलाही त्याची हवी तशी देखभाल करणे अवघड झाले. म्हणून मी या पियानोसाठी चांगल्या संग्राहकाच्या शोधात होतो. केळकर संग्रहालयाकडे तो सुपूर्द करण्याचे मला सुचवले गेले. त्यानुसार, पियानोचे सुयोग्य जतन होईल व पुढील पिढ्यांना तो पाहता येईल, या सद्भावनेने मी तो संग्रहालयाला दिला.’

पियानोवर ‘भोली सूरत…’चे स्वर

ज्येष्ठ संगीत संयोजक आणि ॲकाॅर्डियन-पियानोवादक इनॉक डॅनियल यांच्या हस्ते केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी रविवारी हा पियानो स्वीकारला. या वेळी सुरेश यादव आणि इनॉक डॅनियल यांनी पियानोवर ‘भोली सूरत दिल के खोटे’ या गीताची सुरावट वाजवून संगीतप्रेमींना सुवर्णकाळात नेले. ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर, संगीत क्षेत्रातील जाणकार अभ्यासक डॉ. प्रकाश कामत, मेलडी मेकर्सचे सुहासचंद्र कुलकर्णी, मंगेश वाघमारे, श्याम मोटे, नितीन मेणवलीकर आदी या वेळी उपस्थित होते.