भोसरी – शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी अतिशय असभ्य भाषेत टीका केली. “कोणत्याही पक्षाच्या सदस्याबद्दल बोलणे चुकीचे असून” या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कविता आल्हाट यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
हेही वाचा- पुणे : गंमत म्हणून भिरकावलेला दगड प्रवाशाला लागला, अल्पवयीन मुलाचे कृत्य, रेल्वेतील अल्पवयीनच जखमी
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांची भेट घेऊन अध्यक्षा कविता आल्हाट यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, आमदार नितेश राणे यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर चुकीचे व अत्यंत खालच्या थराला जाऊन गलिच्छ असे विधान केले आहे. डॉ. कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा विसर पडत, विखारी आकसापोटी अशी गरळ ओकणा-या राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच राणे यांनी आपल्या या बालिश बुध्दीचा विचार करून आमदार पदाचा राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आल्हाट यांनी दिला आहे. असंसदीय भाषा वापरून कोणत्याही व्यक्तीच्या आजवरच्या कार्याला बदनाम करणे अतिशय चुकीचे आहे. अशा व्यक्ती आणि प्रकृती दोन्हींचा निषेध करावा तेवढा कमीच आहे म्हणूनच आमदार नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कविता आल्हाट यांनी केली आहे. यावेळी कविता खराडे, पुनम वाघ, संगीता कोकणे, मीरा कदम ,दीपा देशमुख, सुरेखा माळी ,माधवी सोनार, आदी उपस्थित होत्या.