पुणे : महाराष्ट्रात आणि बाहेर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे ते सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे लोकांची भावना ही अनुकूल आहे, असे आमचे लोक सांगतात त्यात तथ्य आहे, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी जुन्नरमध्ये केले. कोणी वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छीत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार की अजित पवार यावरून पक्षातील दोन गटांत वाद सुरू आहेत. अजित पवार गटातील नेत्यांकडून अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा केला जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्नरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणी भाष्य केले.
हेही वाचा : पुणे : मागणी वाढल्याने भाज्या महाग, गृहिणींच्या खर्चावर ताण
जुन्नरमध्ये राष्ट्रवादी कोणाची या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले की, मी महाराष्ट्रात फिरतोय. सर्वसामान्य लोकांमध्ये स्वच्छ कल्पना आहे. सामान्य लोक काय विचार करतो हे महत्वाचे आहे. काल किल्लारीत होतो. तेथे २० हजार लोकं होते. राज्यात सगळीकडे हे चित्र दिसत आहे. वेगळी भूमिका घेतली असेल तर तो त्यांचा लोकशाहीमधील अधिकार आहे. त्यावर मी भाष्य करू इच्छीत नाही.
हेही वाचा : शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”
आगामी निवडणूकीत जुन्नर तालुक्यातून शरद पवार गटाचा चेहरा कोण असेल? याला उत्तर देताना शरद पवार यांनी निवडणुकांना अजून वेळ असल्याचे सांगितले. जुन्नर तालुक्यातील लोकांसंदर्भात माझा अनेक वर्षांतील अनुभव आहे. ते सहसा माझ्या शब्दाला कधी नकार देत नाहीत असेही पवार यांनी सांगितले.