पुणे : ‘पुणे महानगराचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यात केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर सर्वच गोष्टींचा समावेश असावा. यासाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलावीत आणि त्यात ‘एमसीसीआयए’सारख्या संस्थांनी योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी सोमवारी केले.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’च्या (एमसीसीआयए) वतीने आयोजित सहाव्या ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’ला सोमवारी सुरुवात झाली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात सुब्रह्मण्यम बोलत होते. या वेळी बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. जनमेजय सिन्हा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर आणि महासंचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते.
या वेळी सुब्रह्मण्यम म्हणाले, ‘नीती आयोगाकडून देशातील काही शहरांचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यात मुंबई, सुरत आणि विशाखापट्टणम् या शहरांचा समावेश आहे. पुण्यासारख्या शहराचाही आर्थिक विकास आराखडा करण्याची आवश्यकता आहे. त्यात केवळ पुणे शहराचा विचार न करता पुणे विभागाचा विचार करावा. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा. ऊर्जा आणि वाहतूक हे दोन महत्त्वाचे मुद्दे त्यात असावेत. त्यात वर्तुळाकार मार्ग, रेल्वे प्रकल्प यांसारखे पायाभूत सुविधा प्रकल्प महत्त्वाचे असले, तरी त्यावरच थांबू नये. सर्वांगीण आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून पुणे विभागाचा आराखडा तयार करावा. त्यात श्रीमंत, मध्यम आणि गरीब वर्गाचा विचार करायला हवा. त्यातून पुण्याचा विकासाला भविष्यात चालना मिळू शकेल.’
भू-राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतावर होणाऱ्या परिणामांबाबत डॉ. सिन्हा यांनी विवेचन केले. ‘जागतिक पातळीवरील स्थित्यंतराचा भारताला फायदा होऊन आपण आगामी काळात जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावू,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एमसीसीआयए’चे महासंचालक गिरबने यांनी, ‘पुण्याचा आर्थिक विकास आराखडा तयार करण्यासह तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे नमूद केले.
बदलत्या तंत्रज्ञानाकडे लक्ष द्या
प्रवीण परदेशी म्हणाले, ‘जगभरातील अनेक उद्योग हे त्यांच्या सर्वोच्च कालखंडात असताना मृतप्राय ठरले आहेत. त्यात मुंबईतील वस्त्रोद्योगाचाही उल्लेख करावा लागेल. पुणे वाहन उद्योगात सध्या अग्रस्थानी आहे. वाहन उद्योगात आता इलेक्ट्रिक स्थित्यंतर घडत आहे. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उद्योगांनी बदलायला हवे. अन्यथा, ते उद्योग मृतप्राय होतील. त्यामुळे उद्योग क्षेत्राने भविष्याकडे पाहून पावले उचलावीत.’