पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होत आहेत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवाशांना गाडीतच त्यांच्या आसनावर मोफत पिण्याचे पाणी देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
देशातील अनेक भागांमध्ये मागील काही काळापासून उष्णतेची लाट सुरू आहे. उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यातच यंदा लोकसभा निवडणूक असल्याने उत्तरेतील स्थलांतरित कामगार मोठ्या प्रमाणात त्यांच्या मूळ राज्यात परत जात आहेत. यामुळे अनेक गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. रेल्वे प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्यासाठी पावले उचलली आहेत. रेल्वेचे तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत.
प्रवाशांनी पिण्याच्या पाण्यासाठी गाडीतून खाली उतरू नये आणि स्थानकावरील गर्दीत भर पडू नये, म्हणून गाडीतच मोफत पिण्याचे पाणी देण्याची सुविधा पुणे रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आली आहे. पुण्याच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला. दौंड-इंदोर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, पुणे-दरभंगा एक्स्प्रेस बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्स्प्रेस, बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस, पुणे-दानापूर विशेष या गाड्यांतील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.