पुणे : हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासून बाजारात गर्दी झाली होती. मार्गशीर्ष महिन्याची सोमवारी सांगता झाल्यानंतर खवय्यांनी रांगा लावून खरेदी केली.
नववर्ष स्वागतासाठी अनेक जण सामिष पदार्थ तयार करण्याचा बेत रचतात. नातेवाईक, मित्रमंडळीना आमंत्रण दिले जाते. सामिष पदार्थांवर ताव मारून नववर्षाचे स्वागत केले जाते. मंगळवारी सकाळपासून शहर, तसेच उपनगरातील बाजारात मासळी, मटण, चिकन खरेदीसाठी सामिष खवय्यांची गर्दी झाली होती. हाॅटेल व्यावसायिक, घरगुती ग्राहकांकडून मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाली होती.
गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासून खवय्यांची गर्दी होती. कसबा पेठेतील मटण मार्केट, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट, फर्ग्युसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्केट परिसरात गर्दी झाली होती. तसेच पौड फाटा, विश्रांतवाडी, पद्मावती येथील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी १५ ते २० टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची २५ ते ३० टन, नदीतील मासळी एक ते दीड टन, खाडीतील मासळी ४०० ते ५०० किलो अशी आवक झाली, अशी माहिती गणेश पेठेतील मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.
घरगुती ग्राहकांसह हाॅटेल व्यावसायिकांकडून मासळीला चांगली मागणी होती. खवय्यांकडून पापलेट, कोळंबी, सुरमई, रावस, हलवा, ओले बोंबील या मासळीला चांगली मागणी होती. मासळीला मागणी वाढल्याने दरात ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे परदेशी यांनी सांगितले.
मार्गशीर्ष महिन्याच्या सांगतेनंतर खवय्यांची झुंबड
मार्गशीर्ष महिन्यात मटण, मासळी, चिकनला मागणी नसते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते. त्यामुळे सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. सोमवारी अमावस्या होती. मार्गशीर्ष महिन्याची सांगता झाल्यानंतर सामिष खवय्यांची मंगळवारी सकाळपासून मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी झाली होती. मटणाला चांगली मागणी राहिली. हाॅटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढल्याचे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे प्रभाकर कांबळे यांनी नमूद केले. केटरिंग व्यावसायिक, हाॅटेल चालक तसेच घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती, असे पुणे, पिंपरी शहर बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात ७०० ते ८०० टन चिकनची विक्री झाली.
हेही वाचा – बुलढाणा : सात हजार विदेशी एक दिवसीय मद्यसेवन परवाने वाटले, आता प्रत्येक मद्यालयात…
मटण, चिकन, मासळीचे किलोचे दर
मटण- ७६० रुपये
चिकन- २२० रुपये
पापलेट- ८०० ते १८०० रुपये
सुरमई- ४०० ते ८०० रुपये
ओले बोंबील- २०० ते ३०० रुपये
कोळंबी- ४०० ते ७०० रुपये
हवामान बदलामुळे मासळीची आवक कमी
हवामान बदलामुळे खोल समुद्रातून होणाऱ्या मासळीची आवक कमी झाली. मासळी बाजारात एकूण मिळून ५० टन मासळीची आवक झाली. नववर्षामुळे सामिष खवय्ये, हाॅटेल चालकांकडून मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली. मासळीच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली, अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.