पिंपरी-चिंचवडमध्ये तलावात पोहण्यासाठी गेलेले चार मित्र बुडाले होते. यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला असून इतर दोन जणांना वाचवण्यात १३ वर्षीय मुलाला यश आले आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली आहे. सूरज अजय वर्मा अस मृत्यू झालेल्या १२ वर्षीय मुलाचे नाव आहे. तर उपचारादरम्यान ओमकार प्रकाश शेवाळे (वय १३) या मुलाचा मृत्यू झाला आहे. ओमकार वर महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच दोन मुलांना जीवदान देणाऱ्या मुलाचे आयुष गणेश तापकीर, असे नाव आहे.
संदीप भावना डवरी (वय १२), ओमकार प्रकाश शेवाळे (वय १३), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय १४) सूरज अजय वर्मा (वय १२) हे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांची नावं आहेत. हे सर्व मुलं गवळी चाळ चक्रपाणी वसाहत भोसरी येथे राहतात. या सर्वांना पोहण्यासाठी येत होतं की नव्हतं हे समजू शकले नाही, असे भोसरी पोलिसांनी सांगितले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सद्गुरू नगर, जुना कचरा डेपो येथे तलाव आहे. तिथे आज दुपारी ओमकार, ऋतुराज, संदीप आणि मयत सूरज हे चौघे मित्र पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, तलावाच्या आत काही फुटांवर खडक आहे. त्यांच्यापुढे तलावाची खोली जास्त आहे. तिथे हे सर्व जण पोहचताच बुडायला लागले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच म्हैस चारण्यासाठी आलेल्या तेरा वर्षीय आयुषने जीवाची परवा न करता थेट तलावात उडी घेत तिघांचे प्राण वाचविले आहेत. त्यांना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत सूरजचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सूरजचा मृतदेह शोधण्यात आला, अशी माहिती जाधव यांनी दिली आहे.