पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांच्या ६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले आहे. या प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात आयटी पार्कमधील कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. आयटी पार्कमध्ये वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सध्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यातच या रस्त्यांना पर्यायी रस्ते करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे उड्डाणपुलासह नवीन पर्यायी रस्ते तयार केले जाणार आहेत. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात सातत्याने वाहतूककोंडीचे होते. ही कोंडी सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल चारपदरी आणि ७२० मीटर लांबीचा असेल. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

हिंजवडीतील शिवाजी चौक ते स्मशानभूमी या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा रस्ता ९०० मीटर लांबीचा आहे. हा रस्ता सहापदरी केला जाणार आहे. यासाठी २४.७४ कोटी रुपये खर्च येणार आहे. याचबरोबर आयटी पार्कमधील टप्पा एकपासून टप्पा तीनला जोडणारा नवीन रस्ता बांधला जाणार आहे. हा रस्ता ५ किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यासाठी ५८४.१४ कोटी रुपये खर्च येईल. या दोन्ही रस्त्यांच्या जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहेत. याचबरोबर काही भूसंपादन करावे लागणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग ही जागा संपादित करून ‘एमआयडीसी’ला देणार होता. परंतु, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘एमआयडीसी’नेच हे भूसंपादन करावे, असा निर्णय झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी भूसंपादन करून नंतर ही जागा ‘एमआयडीसी’ला हस्तांतरित करण्यात वेळ घालवू नये. थेट ‘एमआयडीसी’नेच भूसंपादन करून रस्त्यांचे काम सुरू करावे, असे निर्देशही त्या वेळी देण्यात आले होते. यामुळे या प्रकल्पांचे भूसंपादन करण्यासाठी ‘एमआयडीसी’कडून प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे.

आयटी पार्कमधील प्रकल्प

लक्ष्मी चौकातील उड्डाणपूल

लांबी : ७२० मीटर

खर्च : ४० कोटी रुपये

शिवाजी चौक ते स्मशानभूमी सहापदरी रस्ता

लांबी : ९०० मीटर

खर्च : २४.७४ कोटी रुपये

आयटी पार्क टप्पा एक ते टप्पा तीन नवीन रस्ता

लांबी : ५ किलोमीटर

खर्च : ५८४.१४ कोटी रुपये

हिंजवडी आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांसाठी एमआयडीसीकडून भूसंपादन केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाने पाठविला होता. तो मुख्यालयाला पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार भूसंपादन सुरू होईल.- अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

हिंजवडी आयटी पार्कला सरकारने प्राधान्य देण्याची गरज आहे. उद्योगमंत्र्यांनी येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी. फक्त मेट्रोमुळे वाहतूक समस्या सुटणार नाही, तर त्यासाठी पर्यायी रस्ते, भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल हे उभारावे लागतील. – पवनजित माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज

आयटी पार्कमधील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करावे, ही मागणी आम्ही आधीपासून करीत आहोत. रस्त्याचे रुंदीकरण केल्यास आणि सातत्याने वाहतूककोंडी होणाऱ्या ठिकाणी सुधारणा केल्यास त्याचा चांगला परिणाम वाहतुकीवर होईल. – ज्ञानेंद्र हुलसुरे, अध्यक्ष, हिंजवडी एम्प्लॉइज अँड रेसिडेंट्स ट्रस्ट