Latest News in Pune Today : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरात सध्या वाढत्या शहरीकरणामुळे वेगवेगळ्या नागरी समस्या उद्भवताना दिसत आहे. या नागरी समस्या, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती. तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत…
Pune Maharashtra News Today 21 March 2025
जागेची मालकी बदलली तरी थकबाकी चुकत नाही; महावितरण अभय योजनेचा लाभ घ्या अन् थकबाकीमुक्त व्हा….
बारामती : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही, ती भरावीच लागते. अशा कायमस्वरुपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरु आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

पुणे : शेजाऱ्यांच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ३० हजारांची रोकड चोरणाऱ्या महिलेला खराडी पोलिसांनी अटक केली.अनिता शशीराव नवसागर (वय ३०, रा. आपले घर सोसायटी, खराडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शेजारी राहणाऱ्या महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरकाम करते.
घरकाम करुन मिळालेल्या पैशांमधून तिने दागिने खरेदी केले होते. तक्रारदार महिला दररोज सकाळी कामानिमित्त बाहेर पडायची. याबाबतची माहिती शेजारी राहणारी अनिता नवसागर हिला होती. रात्री आठच्या सुमारास ती घरी यायची. शेजारी राहणाऱ्या अनिताने १७ मार्च रोजी तक्रारदार महिलेच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने आणि ३० हजारांची रोकड चोरुन नेली होती. रात्री कामावरुन घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. कष्टाने जमा केलेला ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांनी तपास सुरू केलाचोरलेले दागिने आरोपी अनिता नवसागर ही खराडीतील सराफी पेढीत विकण्याच्या तयारीत होती. याबाबतची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र साबळे यांना मिळाली. त्यानंतर पोेलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडून चाेरलेले अडीच लाखांचे दागिने आणि ३० हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव,सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक राहुल काेळपे, सुरेंद्र साबळे, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, अमित जाधव, सचिन रणदिवे, सचिन पाटील, मुकेश पानपाटील, सूरज जाधव यांनी ही कारवाई केली.
नगर रस्त्यावरील विमाननगर भागात वाहतूक बदल – सोमनाथनगर चौकाकडे वळण्यास मनाई
पुणे : नगर रस्त्यावरील विमाननगर भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. विमाननगर परिसरातून उजवीकडे सोमनाथनगर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सोमनानथगरकडे जाणाऱ्या वाहनांनी नगर रस्त्यावरील टाटा गार्डरुम चौकातून उजवीकडे वळून सोमनाथनगरकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखचे पोलीस आयुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.
नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना केली आहे. या भागातील वाहतूक विषयक उपायोजनांमुळे वाहतुुकीचा वेग वाढला आहे. विमााननगर परिसरातून उजवीकडे सोमनाननगर चौकाकडे जाण्यासाठी वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सोमनाथनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी नगर रस्त्याने सरळ पुढे जावे. चंदननगर परिसरातील टाटा गार्ड रुम चौकातील सिग्नलवरुन उजवीकडे वळावे. तेथून वडगाव शेरीतील सोमनाथनगर चौकाकडे जावे. प्रायोगिक तत्त्वावर या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदलांविषयी सूचना असल्यास वाहनचालक, तसेच नागरिकांनी वाहतूक शााखा, पोलीस उपायुक्त कार्यालय, येरवडा येथे पाठवाव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.
भांगमिश्रीत गोळ्यांची विक्री करणारा किराणामाल दुकानदार गजाआड
पुणे : भांगमिश्रीत गोळ्यांची (बंटा) विक्री करणाऱ्या किराणा माल दुकानदाराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात ही कारवाई करण्यात आली. किराणा माल दुकानदाराकडून चार किलो ८०० ग्रॅम भांगमिश्रीत गोळ्या जप्त करण्यात आल्या.
दिनेश मोहनलाल चौधरी (वय ३०, रा. राधाकृष्ण अपार्टमेंट, देशमुखवाडी, शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौधरी मूळचा राजस्थानचा आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून शिवणे भागात किराणा माल दुकान चालवित आहे. चैाधरीने किरामा माल दुकानात भांगमिश्रित गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दुकानात छापा टाकला.
दुकानात पांढऱ्या पोत्यात भांगमिश्रीत गोळ्यांची २४ पाकिटे सापडली. जप्त करण्यात आलेल्या २४ पाकिटांची किंमत १० हजार ४०० रुपये आहे. त्याने भांगमिश्रीत गोळ्या कोणाकडून आणल्या यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्य मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विराेधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, सचिन माळवे, संदीप शिर्के, विशाल दळवी, विपुल गायकवाड, मारुती पारधे, संदेश काकडे यांनी ही कामगिरी केली.
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर वाढला तरी शिक्षकांना महत्व असणारच : राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार निकम
शिरुर : कृत्रिम बुध्दीमत्ते मुळे सर्वच क्षेत्रात मोठे बदल होत आहे . कृत्रिम बुध्दीमत्तेचा वावर वाढत असला तरी शिक्षकांचे महत्व असणारच असल्याचे राज्य प्राचार्य महासंघाचे माजी अध्यक्ष तथा शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम म्हणाले . शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त विद्याधाम प्रशालेचा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
मेट्रोच्या नवीन मार्गिकांवरील स्थानके अत्याधुनिक
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्पातील खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग या मेट्रो मार्गावरील स्थानकांसाठी ‘रचनाकार सल्लागार समिती’साठी खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे.
‘या’ द्रुतगती महामार्गामुळे पुणे-नाशिक शहरे आणखी जवळ येणार
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला पुणे – नाशिक हरित (औद्याोगिक) महामार्ग (ग्रीन कॉरिडॉर) प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. या मार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने नुकतीच प्रसिद्ध केली असून, एक हजार ५४५ हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘कॉपीमुक्त परीक्षा अभियान’ परिणामकारक; सर्वाधिक गैरप्रकार कुठे?
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांतील गैरप्रकारांची संख्या घटली आहे. यंदा राज्यभरात दहावीच्या परीक्षेत ८९, तर बारावीच्या परीक्षेत ३६० गैरप्रकारांची नोंद झाली.
नगर रस्त्यावरील लाॅजवर गुन्हे शाखेचा छापा, महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाला अटक
पुणे : नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात एका लाॅजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला. महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी लाॅज चालकाला पोलिसांनी अटक केली.
प्रकाश रामा शेट्टी (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. महिलेला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलीस शिपाई मयुरी नलावडे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात असलेल्या साई लाॅजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. पोलिसांच्या पथकाने लाॅजवर छापा टाकला.
पोलिसांनी लाॅजमधून एका महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत लाॅज चालक शेट्टी आणि साथीदारांनी महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवयायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लाॅज चालक शेट्टी याला ताब्यात घेऊन अटक केली. शेट्टी याच्यासह चौघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार तपास करत आहेत.
विद्यापीठात मध्यवर्ती स्वयंपाकघर करा, अधिसभेत मागणी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व भोजनगृहांत एकाच दर्जाचे भोजन उपलब्ध होण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर सुरू करण्याची मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी केली आहे. तसा ठराव मांडण्यात आला आहे.
पुण्यात पक्षांतराचे वारे
राजकीय निष्ठा बदलणाऱ्यांसाठी राजकारणात ‘आयाराम-गयाराम’ हा शब्दप्रयोग केला जातो. हरियाणामधील पतौडी विधानसभा क्षेत्रामधील गयालाल या आमदाराने एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला आणि पक्षांतर करणाऱ्यांसाठी ‘आयाराम गयाराम’ ही राजकारणातील ‘उपाधी’ सर्वदूर प्रचलित झाली.
शिक्षण संस्थाचालकाकडे २५ लाखांची खंडणी मागणार्या माजी कर्मचार्यास अटक
पुणे : शिक्षण संस्थाचालकाना २५ लाख रुपयांची खंडणी मागणार्या संस्थेतील माजी कर्मचाऱ्याला सिंहगड रस्ता पोलिसानी अटक केली. सुदर्शन कांबळे (रा. धायरी फाटा) असे या माजी कर्मचार्याचे नाव आहे.
पिंपरी : मालमत्ता कर वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त ‘ऑन ग्राऊंड’, १४ मालमत्ता सील
पिंपरी : महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या पाच लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्ता लाखबंद (सील) करण्यास सुरुवात केली आहे.
बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात पुढील सुनावणीला आरोप निश्चितीचा मसुदा
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींविरोधात आरोप निश्चितीचा मसुदा सरकार पक्षातर्फे ८ एप्रिल रोजी सादर केला जाणार आहे. या प्रकरणात तिसरा आरोपी अद्याप फरार असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५६ नुसार, त्याच्या अनुपस्थितीत खटला चालविण्यात यावा, यासाठीही सरकार पक्षातर्फे अर्ज केला जाणार आहे.
पिंपरी : बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुले होण्यासाठी आणखी प्रतीक्षा, आता…
पिंपरी : चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी नऊ वर्षांपासून बंद असून, आतापर्यंत २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेण्यात आल्याने आणखी सव्वा वर्ष हे संग्रहालय खुले होण्यासाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना, मनुष्यबळामध्ये दोनशे कर्मचाऱ्यांची भर
पुणे : शहराच्या हद्दीमध्ये झालेली वाढ, नव्याने सुरू करण्यात आलेली सात पोलीस ठाणी ध्यानात घेऊन प्रभावी कामकाजासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे मनुष्यबळ वाढविण्यात येणार असून सध्या कार्यरत ३६४ कर्मचाऱ्यांमध्ये आणखी २०० कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे कामकाज सशक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पिंपरी : आता बांधकाम पूर्णत्वानंतर मिळकतकर नोंदणी लगेच
पिंपरी : बांधकाम परवाना विभागाने गृहप्रकल्पाच्या बांधकामास पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्या मिळकतीची कर आकारणी विभागाकडे तत्काळ नोंदणी होणार आहे. त्यामुळे नवीन एकही मिळकत आणि वाढीव बांधकाम करातून सुटू शकणार नाही. त्यासाठी बांधकाम परवानगी आणि करसंकलन विभागाची संगणक प्रणाली एकत्रित करण्यात आली आहे.
पिंपरी : पोलीस आयुक्तालयासाठी वाकड येथील १५ एकर जागा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) वाकड येथील १५ एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मिळाली आहे. या जागेच्या भूसंपादनास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याबाबतचा आदेश गुरुवारी प्रसृत केल्याची माहिती उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. या जागेत पोलीस उपायुक्त कार्यालयासह इतर अनुषंगिक कार्यालये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारली जाणार आहेत.
गायरान, मोकळ्या जागांवर वृक्षारोपण; पिंपरी महापालिकेचा ५७ कोटींचा ‘वृक्षसंवर्धन’ अर्थसंकल्प
पिंपरी : महापालिकेच्या वृक्षसंवर्धन विभागाच्या २०२५-२६ या वर्षाच्या ५७ कोटी ३६ लाख ८६ हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. फळाफुलांचे प्रदर्शन भरविणे, वृक्षांचे पुनर्रोपण, पिंजरे खरेदी व दुरुस्ती, वृक्षगणना, तार कुंपण देखभाल दुरुस्ती, गायरान व मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण तसेच संवर्धन, नर्सरी साहित्य खरेदी केले जाणार आहे.
“चवदार तळे दीपस्तंभासारखे”, माजी खासदार प्रदीप रावत यांचे मत
पुणे : ‘शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही. समाज नैतिकदृष्ट्या खूप पुढे गेला आहे. बऱ्याच बेड्या आता कोसळून पडल्या आहेत. मात्र, काम अजूनही पूर्ण झालेले नाही. सामाजिक समतेच्या लढ्यात पुढे जाण्यासाठी चवदार तळे दीपस्तंभासारखे आहे,’ असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी गुरुवारी व्यक्त केले.