Latest News in Pune Today : पुणे शहर आणि परिसर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. वाहतुकीचे अपडेट्स, गुन्हे वृत्त, नागरी समस्या, राजकीय घडामोडी तसंच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहितीही इथे मिळेल…
Pune Maharashtra News Today, 25 march 2025
बाह्यवळण मार्गावर प्रवासी बस कंटेनरवर आदळली, दहा प्रवासी जखमी
पुणे : प्रवासी वाहतूक करणारी भरधाव बस कंटेनरवर आदळल्याने दहा प्रवासी जखमी झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. अपघातात बसचालक जखमी झाला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टीईटीच्या राखीव निकालप्रकरणी परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय… होणार काय?
पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) काही उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आता या उमेदवारांची २५ मार्च ते दिनांक ४ एप्रिल या कालावधीत सुनावणी घेतली जाणार असून, सुनावणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने बांधकाम ठेकेदाराची दीड कोटींची फसवणूक, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने बांधकाम ठेकेदाराची दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बनावट कंपनी स्थापन करून अडीच कोटींची फसवणूक, सात आरोपींविरुद्ध गुन्हा; ११० जणांची फसवणूक
पुणे : घन कचरा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित बनावट कंपनी स्थापन करुन अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी
पुणे : घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी २० वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
महिलेची फसवणूक करणाऱ्या इसमावर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नारायणगाव : सरकारी कार्यालयाकडून वेगवेगळ्या योजना मिळवून देतो,असे सांगत एका महिलेची फसवणूक करणाऱ्या इसमावर ओतूर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे , अशी माहिती ओतूर पोलीस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
याबाबत आरोपी राजेश रघुनाथ मुकणे, राहणार खालचा माळीवाडा, ता. जुन्नर, जि.पुणे याच्या विरोधात ओतूर पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.फसवणूकी फिर्याद सुशीला धोंडीभाऊ जाधव (वय ५० वर्ष) रा. ओतूर, कातकरी वस्ती, ता. जुन्नर, जि.पुणे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आदिवासी कातकरी समाजातील गरीब महिला सुशिला जाधव यांना राजेश मुकणे याने शासकीय कार्यालयाकडून शासकीय जमीन तुमच्या नावावर करून देतो, असे खोटे सांगत पंधरा हजार रूपये घेतले. तसेच मुकणे याने आणखी इतर कातकरी समाजातील गरीब महिला व पुरूष यांच्याकडून त्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे, माझी तेथे ओळख आहे, येथून विविध योजना मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून काही रोख व ऑनलाईन स्वरूपात रक्कम घेऊन त्यांची देखील फसवणूक केली आहे. या प्रकरणी जाधव यांचे फिर्यादीवरून ओतूर पोलीस स्टेशन येथे मुकणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार भरत सूर्यवंशी हे करीत आहेत.
ओतूर येथे सहा वर्षाचा बिबट्या जेरबंद
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात असलेल्या बाबीत मळा येथे पाच ते सहा वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात सोमवारी (दि.२४ मार्च) रोजी पहाटे ४.३० वा. सुमारास वनविभागाला यश मिळाले आहे .
ओतूर परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे ,ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाबीतमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता , त्यानुसार सोमवारी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास तुकाराम गीते यांचे भ्रमणध्वनीवरून वन विभागाला बिबट्या जेरबंद झाला आहे अशी माहिती समजताच तात्काळ वनपाल ओतूर सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे मोहिनी वाघचौरे तसेच किसन केदार, गंगाराम जाधव, गणपत केदार, फुलचंद खंडागळे,रोहित लांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळ यांना देण्यात आली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वन कर्मचारी,आपदा मित्र वैभव अस्वार, विराज अस्वार, तसेच ग्रामस्थ तुकाराम गीते, गणेश गीते, संस्कार गीते, विकास गीते, कुणाल गीते, पोपट मालकर, प्रदीप तांबे, सुनील मोरे यांचे मदतीने बिबट्यास रेस्क्यू करून माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले आहे .
संघटित समरस हिंदू समाजनिर्मितीचा संकल्प, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षानिमित्त उपक्रम
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाने ‘संघकार्याचा विस्तार आणि समाज परिवर्तन’ यावर भर दिला असून, संघटित समरस हिंदू समाजनिर्मितीचा संकल्प केला आहे.
त्यानिमित्त प्रत्येक गाव, वस्ती आणि घरापर्यंत संपर्क मोहीम राबविण्यात येणार आहे. ठिकठिकाणी हिंदू संमेलने, सामाजिक सद्भाव मेळावे, नागरिक संवादांच्या माध्यमातून राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच, कथित कथानकापासून (फेक नरेटिव्ह) दूर कसे राहावे, यावर भर देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश उर्फ नानासाहेब जाधव यांनी ही माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत प्रचारप्रमुख अतुल अग्निहोत्री, महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
टपरी चालक ते विधानसभा उपाध्यक्ष; आमदार अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास
पिंपरी : स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा असलेल्या पिंपरी- चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उपाध्यक्षदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिरूरमध्ये युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
शिरूर : शिरूर येथील रामलिंग रोडवर १८ वर्षांच्या युवतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंजली गजानन टिपरे (वय १८, वर्ष, सध्या रा. पोद्दार शाळेजवळ ,रामलिंग रोड , ता. शिरूर ,जि. पुणे. मूळ राहणार बान्सी , ता. पुसद, जि .यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे .
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजू रामदास टिपरे (वय ४८ वर्षे, धंदा-वीटभट्टी मजुरी, सध्या रा. पोद्दार शाळेजवळ रामलिंग रोड शिरूर, जि .पुणे मुळ रा. बान्सी ता. पुसद , जि .यवतमाळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
२४ मार्च रोजी पहाटे ३ वाजता राजू टिपरे हे वीटभट्टी येथे कामास गेले होते. त्यावेळी पुतणी अंजली ही देखील त्यांच्या सोबत आली होती. त्यानंतर सकाळी पावणेदहाचा सुमारास तिने त्यांना कामाच्या ठिकाणी चहा करून आणून दिला व ती घरी निघून गेली. सकाळी साडेदहा सुमारास राजू यांची मुलगी वीटभट्टीवर आली. अंजलीने घराचा दरवाजा बंद केला असून, ती घराचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्यावेळी राजू व त्यांची पत्नी शीतल यांनी घरी जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा बंद होता. त्यावेळी अंजली हिला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता ती आतून प्रतिसाद देत नसल्याने राजू यांनी दरवाजा जोरात ढकलून उघडला. त्यानंतर अंजलीने ओढणीने गळफास करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
उपचारासाठी तिला तिला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मरण पावल्याचे घोषित केले. याबाबतचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत .
ज्येष्ठ दाम्पत्याच्या सदनिकेत चोरी करुन पसार झालेले अल्पवयीन ताब्यात , अल्पवयीनांकडून साडेपाच लाखांचे दागिने जप्त
पुणे : काेथरूड भागात ज्येष्ठ दाम्पत्याच्या सदनिकेतून साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरुन पसार झालेल्या अल्पवयीनांना अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन सराइत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोथरूड भागातील हॅप्पी काॅलनीत एका सोसायटीत ज्येष्ठ दाम्पत्य राहायला आहे. ७ मार्च रोजी बंद सदनिकेचे कुलूप तोडून अल्पवयींनांनी कपाटातील साडेपाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांनी घटनास्थळी भेट दिली. घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
त्यानंतर तपास पथकाने सदनिकेत चोरी करुन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी कोथरूड परिसरातील २०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तपासात मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले.
शाळांच्या परीक्षा सकाळच्याच सत्रात… आता महसूल आणि वन विभागाचे निर्देश
पुणे : उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल आणि वन विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
‘आरटीई’च्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशांसाठी मुदतवाढ… किती विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश?
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता प्रवेशासाठी १ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
‘मुळा नदी सुधार’साठी झाडांवर कुऱ्हाड; पर्यावरणप्रेमींचा आक्रोश
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०० काेटींचे कर्जराेखे उभारून हाती घेतलेला मुळा नदी सुधार प्रकल्प विविध कारणांनी वादात सापडला आहे. ‘मुळा नदी सुधार’साठी झालेली वृक्षतोड, नद्यांच्या नैसर्गिक प्रवाहात हस्तक्षेप करून काँक्रीटीकरणावर भर दिला जात असल्याचा दावा करीत पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.
शहरबात (कायदा-सुव्यवस्थेची) : आभासी आमिषांचे बळी
आभासी विश्वात अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवणे हे किती धोकादायक आहे, याची प्रचिती दररोज येत असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने आतापर्यंत एकट्या पुणे शहरातील नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
२५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, महावितरणकडून मोहीम सुरू
पुणे : महावितरणने थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली असून, पुणे परिमंडलातील २५ हजार ४३४ थकबाकीदारांचा वीजपुरवठा गेल्या २४ दिवसांत खंडित करण्यात आला आहे.
हिंजवडी आयटी पार्कची ‘बत्ती गुल’! अखेर वीजपुरवठा खंडित होण्याचं नेमकं कारण आलं समोर…
पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. यामुळे या माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमधील शेकडो कंपन्यांना फटका बसत आहे. आंबेगावमधील डोंगराळ भागात लागत असलेल्या आगीच्या घटनांमुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी जप्त केलेले आठ कोटींचे अमली पदार्थ आज नष्ट, रांजणगाव ओैद्योगिक वसाहतीत नष्ट करण्याची प्रक्रिया
पुणे : पुणे पोलिसांनी गेल्या वर्षी शहरातील वेगवेगळ्या भागातून गेल्या वर्षी सात कोटी ७६ लाख रुपयांचे ७८८ किलो अमली पदार्थ जप्त केले होते. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ रांजणगाव येथील खासगी कंपनीच्या भट्टीत नष्ट केले जाणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात डीएनए अहवालाची प्रतीक्षा
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली असून, चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झाला नाही.
पिंपरी : फायरमनची भरती रखडली; निवड समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळेना…
पिंपरी : महापालिकेच्या अग्निशामक विभागासाठी अग्निशामक विमोचक (फायरमन रेस्क्युअर) या पदाच्या १५० जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेला सात, तर मैदानी परीक्षेला दाेन महिने हाेऊन गेल्यानंतरही फायरमनची भरती रखडली आहे. निवड समितीच्या बैठकीला अद्याप मुहूर्त मिळत नसल्यामुळे या पदाच्या अंतिम यादीला विलंब झाल्याचे निदर्शनास आले आहे.
वर्षभरापासून ‘रेडझोन’ हद्दीचा संभ्रम कायम; नकाशा कधी होणार प्रसिद्ध? प्रशासनाने दिली ‘ही’ माहिती
पिंपरी : देहूरोड आणि दिघी भागातील संरक्षित जागेची (रेड झोन) राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने ‘सॅटेलाइट’द्वारे मोजणी करून एक वर्ष उलटून गेले, तरी अंतिम नकाशा तयार झालेला नाही. अचूक आणि स्पष्ट सीमा असलेल्या नकाशाची नागरिकांना प्रतीक्षा असून, नकाशा प्रसिद्ध होत नसल्याने रेडझोन सीमेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स
पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स