Latest News in Pune Today : पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्याच्या दृष्टीने तिसऱ्या टप्प्यात सातारा रस्त्यावरील नवले पूल ते सारोळे आणि हिंजवडी ते माण येथे कारवाई सुरू करण्यात आली आहे. पिंपरीत मालमत्ता विरोधी पथकाने दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई कासारवाडी पुलाखाली करण्यात आली. अजर रमजान सय्यद विरोधात दापोडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा राजकीय, वाहतूक, गुन्हे, सांस्कृतिक, नागरी समस्या अशा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, मावळ तसंच पुणे जिल्ह्यातील विविध घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.
Pune Maharashtra News Today, 27 march 2025
चैत्र मासाच्या स्वागतासाठी जेजुरीत सुगंधी दवण्याची शेती बहरली, खंडोबा गडाच्या पायथ्याशी विक्री सुरू
श्रीक्षेत्र जेजुरी परिसरातील दवणेमळा येथील शेतकऱ्यांनी लागवड केलेली दवण्याची शेती आता फुलोऱ्यात आली असून दवणा शेतामध्ये सर्वत्र पसरलेला सुगंध चैत्रमासाच्या आगमनाची चाहूल देत आहे.
…असा असेल भविष्यातील माणूस; मानववैज्ञानिक डॉ. सुभाष वाळिंबे यांचे माणसाच्या जडणघडणीवर भाष्य
पुणे : ‘माणूस अजूनही उत्क्रांत होत आहे. उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात होणाऱ्या बदलांबाबत अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार भविष्यात माणसाची उंची वाढेल. मात्र, औषधांच्या अतिवापरामुळे रोगप्रतिकारशक्तीचा अभाव असेल. प्रौढ मानवाच्या जबड्याचा आकार लहान व तुलनेने डोक्याचा आकार मोठा अशी रचना असेल, असे मत मानववैज्ञानिक-पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. सुभाष वाळिंबे यांनी व्यक्त केले.
जनसामान्यांना ‘एसटी’ची सुरक्षित आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणार, स्वारगेट बस स्थानकातील गैरप्रकारानंतर प्रशासनाचे पाऊल
पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट, वाकडेवाडी, बारामती आणि इतर ठिकाणच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस स्थानकांमध्ये आधुनिक सुविधांच्या माध्यामातून प्रवाशांना सुलभ सेवा आणि सुलभ प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही पुणे ‘एसटी’महामंडळाचे नवनियुक्त विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली. मंगळवारी त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर स्वारगेट, वाकडेवाडी आणि इतर बस स्थानकांची पाहणी केली.
पुणे : रेल्वे स्थानकात असुविधांचा विळखा; प्रवासी त्रस्त, पायाभूत सुविधांचा अभाव
पुणे : उन्हाच्या तीव्र झळा, प्रवाशांची गर्दी, अपुरी आसन व्यवस्था, प्रतीक्षाकक्षात गर्दी, त्यामुळे स्थानकातील फरशीवर रेल्वेच्या प्रतीक्षेत बसलेले प्रवासी, बंद पडलेले शौचालय, बंद असलेली बॅटरीवरची वाहने, सुरू न झालेली उद्वाहन सुविधा आणि त्यामुळे त्रस्त प्रवासी… पुणे रेल्वे स्थानकात सध्या असे चित्र दिसत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा काळ सुरू होत असल्याने रेल्वे गाड्यांना गर्दी वाढत असताना, त्यात स्थानकावर प्रवाशांना अशा असुविधांचा सामना करावा लागतो आहे.
बारामतीत लिनेस क्लबच्या वतीने माता व मुलींचा सन्मान
बारामती : आत्मनिर्भर महिलांकडून त्यांच्या मुलींनाही सर्वसमावेशक बनविण्यासाठी प्रयत्न करणा-या आई व मुलींच्या जोडीचा नुकताच बारामतीत ऑल इंडिया लिनेस क्लब ऑफ बारामतीच्या वतीने सन्मान केला गेला. माँ से बेटी सवाई, म्हणजे जी आई स्वतः एक आत्मनिर्भर, स्वावलंबी स्त्री आहे, तिने तिच्या मुलीला सुद्धा स्वःताच्या पायावर सक्षमपणे उभे करत कर्तृत्वान बनविले अशा आई आणि मुलींच्या जोडीचा सन्मान या प्रसंगी झाला. यात उद्योग, कला, शैक्षणिक, वैदयकीय, शेतकरी कुटुंबातील मुलींचा सन्मान झाला.
पंचक्रोशीतील तेरा आई मुलींचा सत्कार करण्यात आला. वैष्णवी ननवरे, सेजल ओसवाल, ऐश्वर्या जामदार, शिवानी तावरे, दिव्यश्री गांधी, तेजश्री मोरे, भाग्यश्री शिंदे, संध्या सस्ते, पूनम जाधव, अमृता भापकर, सुनेत्रा शिंदे, ज्योती भोसले, सिद्धी संगई यांचा यात समावेश होता. भाग्यश्री शिंदे म्हणाल्या, "अपार कष्ट करून आईने शिक्षण दिले, कोणाचाही विचार न करता नेहमी माझ्यावर विश्वास टाकत राहिली,हाच विश्वास मी कायम टिकवून पुढे वाटचाल करेन."
माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सुमन जाचक, धनश्री गांधी, लिनेस कल्ब बारामतीच्या अध्यक्षा उज्वला शिंदे आदी उपस्थित होत्या, मनिषा शिंदे यांनी प्रास्तविक केले, संगीता भापकर यांनी आभार मानले, पल्लवी शहा -सराफ, रिनल शहा, पूनम जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
सांगवीतील चिमुकल्या रायाजीची कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई
पिंपरी : सांगवीतील दोन वर्षीय रायाजी घारे याने सतरा दिवसांत राज्यातील सर्वांत उंच किल्ला साल्हेर आणि कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्याच्या कळसूबाई शिखरावरील चढाईची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
पिंपरी : महापालिका उंदीर खरेदी करणार; एका उंदराची किंमत किती?
पिंपरी : मागील नऊ वर्षांपासून नूतनीकरण, सुशोभिकरणाच्या नावाखाली बंद असलेल्या चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील सर्पांसाठी पांढरे उंदीर खरेदी करण्यात येणार आहेत. एका उंदराची किंमत १५९ रुपये आहे. दोन वर्षे उंदीर घेतले जाणार असून, त्यासाठी नऊ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या कोठडीत वाढ
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या न्यायालयीन कोठडीत ८ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी बुधवारी दिले.
पुणे : विमानतळ परिसरातील कोंडी सुटणार?
पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरातील कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या नवीन टर्मिनल परिसरातील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहने लावण्यास मनाई (नो-पार्किंग झोन) करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला आहे. त्यानुसार या भागात रिक्षा, तसेच मोटारी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ससून रुग्णालयातून विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी पसार
पुणे : ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला कैदी बुधवारी सकाळी पसार झाल्याची घटना घडली. विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला कराड पोलिसांनी अटक केली होती. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.
पुणे : मिळकतकरातून आत्तापर्यंत २ हजार २२९ कोटींचे उत्पन्न, पाच दिवसांमध्ये चारशे कोटी जमविण्याचे आव्हान
पुणे : महापालिकेच्या कर आकारणी आणि करसंकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) मिळकतकरातून २ हजार २२९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये समाविष्ट गावांमधून ४१४.०९ कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले असून मंगळवारी (२५ मार्च) एकाच दिवशी सर्वाधिक १३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकतकर जमा झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणे : ‘अतिक्रमणमुक्त’ महामार्गांच्या तिसऱ्या टप्प्याला प्रारंभ, सातारा रस्त्यावरील नवले पूल ते सारोळा या दरम्यान कारवाईला वेग
पुणे : शहर आणि परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ‘अतिक्रमणमुक्त’ करण्याच्या दृष्टीने तिसऱ्या टप्प्यात सातारा रस्त्यावरील नवले पूल ते सारोळे आणि हिंजवडी ते माण येथे कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अभियोग्यता चाचणी कधी होणार? परीक्षा परिषदेने दिली माहिती..
पुणे : शिक्षक होण्याची इच्छा असलेले उमेदवार अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार येत्या मे आणि जूनमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येणार असून, उमेदवारांनी त्यासाठीची पूर्वतयारी करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
पिंपरी- चिंचवड: दोन पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह एकाला बेड्या; पिस्तुल कोणाला विकरणार होता?
पिंपरी- चिंचवड : मालमत्ता विरोधी पथकाने दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई कासारवाडी पुलाखाली करण्यात आली. अजर रमजान सय्यद विरोधात दापोडी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करण्याची गरज, डॉ. माधव गाडगीळ यांचे मत
पुणे : ‘प्रदूषण नियंत्रणासाठी शासनाकडून आकडे जाहीर होतात. मात्र, प्रत्यक्षात काय काम केले जाते, हा प्रश्न पडतो. नद्यांच्या शुद्धीकरणासाठी केवळ अभियान घोषित करणे पुरेसे नाही. नदी प्रदूषणाच्या मुळाशी जाऊन काम करायला हवे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी बुधवारी व्यक्त केले.
गौरव आहुजाला जामीन मंजूर
पुणे : भर चौकात लघुशंका प्रकरणात गौरव आहुजाला न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणात अटक केल्यानंतर गौरव गेले पंधरा दिवस येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
विमा कंपनीला तीन कोटींच्या खंडणीसाठी ई – मेल, बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी
मुंबईः प्रसिद्ध विमा कंपनीला तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ई-मेल पाठविण्यात आला आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने बीटकॉईनमध्ये खंडणीची मागणी केली असून खंडणी न दिल्यास कंपनीची महत्त्वाची माहिती सार्वजनिक करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सायबर तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मदतीने तपास सुरू आहे.