Pune Breaking News LIVE Updates : राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, वेगाने होत असलेले नागरीकरण यामुळे विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत. तेव्हा पुणे शहर, परिसर तसंच पुणे जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह न्यूज ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Pune Maharashtra News LIVE Today
बारामतीच्या तहसील कार्यालयात दिव्यांगाना नाहक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक दिल्याची अपंगाची तक्रार
बारामती : जागृती अपंग विश्वस्त संस्था यांच्या वतीने दीपक विश्वनाथ गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी बारामती येथील कार्यालयात निवेदन सादर केले आहे, या निवेदनामध्ये बारामतीच्या तहसील कार्यालयाकडून अपंग बांधवांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची तक्रार व्यक्त करण्यात आली आहे.
बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; वानवडी पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोरपडीतील ढोबरवाडीत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वानवडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत, हे आहे कारण!
पुणे : गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या याचिकांवर आज मंगळवारी (४ मार्चला) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पुण्यात बेकायदा जाहिरात फलक उभारला, ‘आका’ कोण?
पुणे : संभाजी पोलिस चौकीच्या मागे असलेल्या नदीपात्रातील जागेत महापालिकेलाही न जुमानता बेकायदा जाहिरातफलक उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जाहिरात फलकाला महापालिकेने कोणतीही परवानगी दिलेली नसताना आणि महापालिकेने होर्डिंग उभारताना आक्षेप घेतल्यानंतरही हे होर्डिंग उभे राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
“लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवणार नसाल तर त्या सरकरचा…” सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल
पुणे : राज्यातील सत्ताधारी सरकार महिलांसाठी योजना राबवून लाडकी बहिणीच्या नावाने गोडवे गात आहेत, त्याच सरकारच्या काळात महिलांबाबत अत्याचार वाढत आहेत. बहिणींना सुरक्षित ठेवणार नसाल, तर त्या सरकारचा काय उपयोग? अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर केली.
वाहतूक कोंडीमुक्त आणि सुलभ प्रवासासाठी महामेट्रोचा सामाईक कृती आराखडा
पुणे : घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून घरापंर्यंत अशी सुलभ सेवा देण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनकडून (महामेट्रो) रिक्षाचालकांसोबत लवकरच ‘सामाईक कृती आराखडा’ तयार करण्यात येणार आहे. मेट्रोचे सहज वापर आणि वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महामेट्रोने रिक्षाचालक संघटनांच्या मदतीने कार्यवाही करण्याबाबत पुढाकार घेतला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुण्यात वाल्मिक कराडच्या फाशीच्या मागणीसाठी शिवसेनेचं आंदोलन
पुण्यातील अलका टॉकीज चौकात शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी वाल्मिक कराड याचा पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला आणि वाल्मिक कराड सह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी नाना भानगिरे म्हणाले, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास ८० दिवस उलटून गेले आहेत.या हत्येच्या दरम्यानचे फोटो समोर आले आहेत.हे फोटो पाहिल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आहे.यामुळे या प्रकरणातील वाल्मिक कराड सह सर्व आरोपींना न्यायालयाने लवकरात लवकर फाशी देऊन देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा,तसेच यापुढील काळात राज्यात कधीच घटना घडू नये,म्हणून राज्य सरकार कडक कायदे करावे,अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
राज्यभरातील बस स्थानकाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांची उद्या निदर्शने; प्रलंबित मागण्या मान्य झाल्या नाही तर…
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांची वेतवाढ, थकबाकी, महागाई भत्ता आदी मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर ५ मार्च रोजी राज्यातील सर्व बस स्थानके आणि आगारांच्या बाहेर निदर्शने करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेकडून देण्यात आला आहे.
मारहाणीची घटना गैरसमजुतीतून; कोथरूड प्रकरणात फिर्यादीचे प्रतिज्ञापत्र, गजा मारणेची चिथावणी नाही
पुणे : कोथरूड भागातील संगणक अभियंता तरुणाला गुंड गजा मारणे टोळीतील सराईतांनी मारहाण करण्याच्या प्रकरणााला वेगळेच वळण लागले आहे. ‘मारहाण प्रकरणात कोणी चिथावणी दिली नाही’, असे प्रतिज्ञापत्र संगणक अभियंत्याने सोमवारी विशेष न्यायालयात सादर केले.
रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नवीन कोचिंग डेपो
पुणे : मध्य रेल्वे पुणे विभागातील रेल्वेच्या डब्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी नव्याने ‘कोचिंग डेपो’ सुरू करण्यात येणार आहे. आळंदी येथील स्थानकावर हा डेपो उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष म्हणजे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’च्या डब्यांची निर्मिती आणि दुरुस्ती या ठिकाणी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्यातून दोन कोटींच्या खंडणीसाठी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण
पुणे : दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
‘ग्राहकांनी आमच्याकडे माणूस म्हणून पहायला हवे’, ‘प्रकाशदूतां’चा आज सन्मानदिन
पुणे : वीजनिर्मितीपासून सर्वसामान्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यापर्यंत असलेल्या अवाढव्य यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘लाइनमन’. या प्रकाशदूताच्या सन्मानाचा आज दिवस. ग्राहकांच्या तक्रारी आणि विजेशी संबंधित अहोरात्र कामे करताना लाइमन हादेखील माणूसच असतो, हे सर्वांनी समजून घ्यावे, अशा भावना त्यांनी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.
पिंपरीत पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’; ‘या’ दिवशी राबविणार विशेष उपक्रम
पिंपरी : महापालिका पहिल्यांदाच वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करत आहे. येत्या शनिवार व रविवार (दि. ८ व ९ मार्च) रोजी दोन दिवस सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपक्रम पिंपरी मार्केट परिसरात, साई चौक ते महर्षी वाल्मिकी चौक दरम्यान राबवला जाणार आहे.
बालभारती ते पौड फाटा रस्ता हवाच! कोथरूडमधील भाजप पदाधिकाऱ्याची भूमिका चर्चेत !
पुणे : गेल्या महिन्यात बालभारती ते पौड फाटा रस्त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देऊन जवळपास १० लाख नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासामधून मुक्ती मिळण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
राष्ट्रीय पखवाजवादन स्पर्धेत पार्थ भूमकर द्वितीय
पुणे : गुजरात राज्य संगीत अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या पं. नंदन मेहता शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेच्या पखवाज वादनामध्ये ज्येष्ठ पखवाजवादक तुकारामबुवा भूमकर यांचे नातू पार्थ भूमकर द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले.
संगीत रत्न पुरस्कार अशोक पत्की यांना जाहीर
पुणे : चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना ‘संगीत रत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
प्रभा अत्रे यांचा राग-समयसिद्धान्त पुढील पिढीला उपकारक; पं. सुरेश तळवलकर यांचे मत
पुणे : अभिजात संगीताच्या परंपरेची मूल्ये बुजुर्ग कलाकारांनी जपणूक करत बदलातून रुजवली आहेत. युवा पिढीच्या कलाकारांनी चौकटीबाहेर जाऊन सादरीकरणासाठी मानसिकता तयार करून घेणे आवश्यक आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी अनेक वर्षांच्या साधनेतून रागप्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त संगीत सादरीकरणाची भूमिका मांडली.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान डॉ. अरुणा ढेरे यांना जाहीर
पुणे : विदिशा सांस्कृतिक मंचच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांना यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवरून उड्डाणे बंद!
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जुन्या टर्मिनलच्या पुनर्बांधणीच्या कामाला येत्या आठवडाभरात सुरुवात होणार आहे. त्यामुळे बुधवारपासून (५ मार्च) सर्व उड्डाणे नवीन टर्मिनलवरून होणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली.
“कर्जमाफी द्या अन्यथा…” क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा इशारा
पुणे : क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे सोमवारी पत्रकार भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. दरम्यान, आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जाणारे शेतकरी नेते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धारेवर धरले.
रोजगारनिर्मिती योजनेचा निधीअभावी ‘कार्यक्रम’
पुणे : राज्यात स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना साहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे राबवण्यात येणाऱ्या योजनेचा निधीअभावी ‘कार्यक्रम’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम या योजनेमध्ये २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीच्या सुमारे ५० टक्केच प्रत्यक्ष निधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोट्यवधी मुल्यांच्या चार रो-हाऊसचा लिलाव, ऑनलाइन पद्धतीने अर्जासाठी २४ मार्चपर्यंत मुदत
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या शिल्लक २२ गाळे आणि ४ रो-हाऊस यांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या २४ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांच्या ७५ टक्के उपस्थिती अनिवार्यतेमध्ये शिथिलता; यूजीसीच्या सचिवांनी दिले संकेत
पुणे : महाविद्यालय, उच्च शिक्षण संस्थेत ७५ टक्के उपस्थिती अनिवार्यतेचा नियम आहे. मात्र, आता या नियमात शिथिलता देण्याचे संकेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रा. मनीष जोशी यांनी दिले. एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे संकेत दिले.
काँग्रेसचा आज महापालिकेवर मोर्चा
पुणे : काँग्रेसतर्फे नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी मंगळवारी (दि. ४ मार्च) दुपारी साडेतीन वाजता महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी बी. एम. संदीप यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनपासून या मोर्चाला सुरुवात करण्यात येणार आहे.
कर्कश ‘सायलेन्सर’ शांत करण्याची गरज!
रात्री-अपरात्री शहराच्या वेगवेगळ्या भागांतून भरधाव जाणारे बुलेटस्वार आणि त्यांच्या गाड्यांतून निघणाऱ्या फटाक्यासारख्या आवाजामुळे धडकी भरल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलिसांकडे करण्यात येतात. असे आवाज काढणाऱ्या बुलेट, तसेच दुचाकीस्वारांविरुद्ध कोंढवा आणि लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली.
हर्षवर्धन पाटील यांच्याकडून इंदापूर बसस्थानकाची झाडाझडती!
इंदापूर : स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या गंभीर घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. एसटी प्रशासनासह विविध राजकीय पक्ष संघटनाही आता खडबडून जाग्या झाल्या आहेत. अशा घटना कुठेही पुन्हा घडू नये .म्हणून, करावयाच्या उपाययोजना संदर्भात व सतर्क राहण्याच्या संदर्भात आज राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जेष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर बस स्थानकाला भेट देऊन प्रत्येक विभागाची अत्यंत बारकाईने चौकशी केली.
दत्तात्रय गाडेकडून आणखी काही गुन्हे? गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेने धमकावून अत्याचार आणि विनयभंगाचे आणखी काही गुन्हे केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संबंधितांनी गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, आवाहन पोलिसांनी केले आहे.
महामार्ग वाहतूक कोंडीमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल; संयुक्त कारवाईमध्ये महामार्गालगतची २०१ अतिक्रमणे हटविली
पुणे : शहर आणि परिसरालगतचे महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त करण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिले पाऊल टाकले आहे. पीएमआरडीएसह अन्य शासकीय यंत्रणांनी संयुक्त कारवाई करत तीन प्रमुख मार्गावरील २०१ अतिक्रमणे हटवित आहेत. त्यामुळे २० हजार चौरस फुटांपर्यंतचा रस्ता मोकळा झाला आहे.
Crime News : पुण्यात चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना पोलिसांनी केली अटक
Crime News स्वारगेट या ठिकाणी बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे लाईव्ह अपडेट्स| पुणे न्यूज लाईव्ह अपडेट्स