पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवारी अखेरची मुदत आहे. आता प्रवेश प्रक्रियेत विशेष फेऱ्या राबवल्या जातील.

हेही वाचा – पुणे : इको फ्रेंडली गणेश मूर्तींसाठी राहुल देशपांडे यांचा सहभाग

यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी महाविद्यालयांमध्ये १ लाख ८ हजार ८३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी ८५ हजार २४० जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. तिसऱ्या फेरीत एकूण १२ हजार २५३ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. मंगळवारी सायंकाळपर्यंत केंद्रीय पद्धतीने ३६ हजार ५३० विद्यार्थ्यांनी, तर राखीव कोट्याद्वारे ७ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तिसऱ्या फेरीच्या वेळापत्रकाननुसार प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी बुधवारी (२४ ऑगस्ट) अंतिम मुदत आहे. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या राबवण्यात आल्या आहेत. तर नियमित फेऱ्यांनंतर आता विशेष फेऱ्या राबवल्या जातील. पहिल्या विशेष फेरीची प्रक्रिया २५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल.

प्रवेश समितीच्या सचिव मीना शेंडकर म्हणाल्या, की नियमित फेऱ्या झाल्यानंतर साधारणपणे दोन विशेष फेऱ्या होऊ शकतील. नियमित फेऱ्या आणि विशेष फेऱ्यांतून ८० टक्के प्रवेश पूर्ण झाल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवली जाईल. विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रवेश अर्ज लॉक करणे आवश्यक आहे. विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज प्रणालीद्वारे अनलॉक करून दिले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष फेरीतून प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी त्यांचा अर्ज लॉक करणे, लॉक झालेल्या प्रवेश अर्जाची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यानंतरच विशेष फेरीमध्ये विद्यार्थ्यांच्या अर्जाचा विचार होईल.