पुणे : पुणे महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील अडथळा दूर झाला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी आवश्यक असणारी संगमवाडी येथील संरक्षण दलाची जागा पुणे महापालिकेला देण्यात आली आहे. ही जागा १७ एकर असून, ती पालिकेच्या ताब्यात देण्यात आल्याचे पत्र संरक्षण विभागाने महापालिकेला दिले आहे. यामुळे या कामाला वेग येणार आहे.

पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचा एकात्मिक पद्धतीने विकास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून काम हाती घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने नदी सुधारणा प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

शहरातून वाहणाऱ्या या नद्यांची शहरातील एकूण लांबी ४४.४० किलोमीटर आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची एकूण ११ भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन पूलदरम्यान संरक्षण विभागाची सादलबाबा दर्गाह ते संगमवाडी स्मशानभूमी या दरम्यान जागा आहे. ही जागा प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याची कार्यवाही महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली होती.

या प्रकल्पासाठी संरक्षण विभागाची १७ एकर जागा महापालिकेला मिळावी, यासाठी महापालिकेने प्रस्ताव तयार करून तो संरक्षण विभागाला पाठविला होता. ही जागा महापालिकेला मिळावी, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही जागा पालिकेला हस्तांतरित करण्यात आल्याचे पत्र संरक्षण विभागाने महापालिकेला पाठविले आहे.

संरक्षण विभागाने दिलेल्या जागेमुळे या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार असून, पुढील काही दिवसांमध्येच हा प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्वास महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, संरक्षण विभागाच्या जागा मिळविण्यासाठी यापूर्वी वारंवार पाठपुरावा करावा लागत होता. २०१४ मध्ये देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर यामध्ये गतिमानता आली आहे. नागरी प्रकल्पांचे गांभीर्य आणि गरज ओळखून प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविल्या जात आहेत. हि जागा मिळाल्याने या प्रकल्पाचे काम अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

Story img Loader