पुण्यातील जकातीची आकारणी रविवारी मध्यरात्री बंद झाली आणि जकात वसुलीच्या १५६ वर्षांच्या प्रक्रियेला पूर्णविराम मिळाला. पुणे नगरपालिकेकडून पुण्याच्या कारभाराला सुरुवात झाल्यानंतर मे १८५८ मध्ये प्रथम टोलची आणि त्यानंतर जकातीची आकारणी शहरात सुरू झाली होती. पुण्यात जकातीचे पहिल्या वर्षीचे उत्पन्न २० ते २५ हजार रुपये इतके होते आणि यंदा ते तेराशे कोटींवर गेले आहे.
पुणे नगरपालिकेची स्थापना झाल्याचे राजपत्र २० मे १८५७ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आणि ‘आजपासून पुणे नगरपालिका स्थापन झाली असून १ जून १८५७ पासून तिचे कामकाज सुरू होईल’ असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, देशात इंग्रजांविरुद्ध सुरू झालेल्या बंडामुळे पुणे नगरपालिकेचे कामकाज या घोषणेप्रमाणे सुरू होऊ शकले नाही. ते प्रत्यक्षात मे १८५८ मध्ये सुरू झाले. त्यावर्षीपासूनच नगरपालिकेने टोल कराची आकारणी सुरू केली आणि पहिल्यावर्षीचे नगरपालिकेचे एकूण उत्पन्न २८ हजार रुपये होते. त्यातील मोठा वाटा टोलचाच होता. उपलब्ध आकडेवारीवर नजर टाकली, तर पहिल्या वर्षी महापालिकेला टोलद्वारे सुमारे २० ते २५ हजारांचे उत्पन्न मिळाले होते आणि रविवारी (३१ मार्च) संपलेल्या आर्थिक वर्षांत महापालिकेचे जकातीचे उत्पन्न तेराशे कोटींवर गेले आहे. पहिल्या अकरा वर्षांच्या टोलआकारणीनंतर सन १८६९-७० मध्ये टोलऐवजी पुण्यात जकात सुरू झाली आणि त्यावर्षी नगरपालिकेचे उत्पन्न एक लाख २९ हजार इतके झाले होते.
पुणे नगरपालिका आणि १९५० साली स्थापन झालेली महापालिका यांच्या उत्पन्नावर नजर टाकली, तर पहिल्या वर्षांपासून जकातीच्या उत्पन्नाचाच वाटा आजतागायत सर्वाधिक राहिला आहे. सन १८८२ मध्ये जकातीचे उत्पन्न ६८ टक्के इतके होते, तर सन १९४६ मध्ये ते ५८ टक्के होते. त्यानंतरही एकूण उत्पन्नाच्या सरासरी ४५ ते ५० टक्के एवढे उत्पन्न जकातीचेच राहिले आहे. महापालिकेचे जकात कार्यालय महापालिकेजवळच असून ते शिवाजीराव आढाव आयातकर भवन नावाने ओळखले जाते. या इमारतीत १३ नोव्हेंबर १८८२ मध्ये हे कार्यालय आले, त्यापूर्वी सध्या जेथे श्रमिक भवन उभे आहे त्या परिसरात जकात विभागाचे कार्यालय होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 सहा आण्यांची लाच; कारकुनावर कारवाई
पुणे महापालिकेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. त्याचे संपादन डॉ. मा. प. मंगुडकर यांनी केले असून या ग्रंथात अनेक माजी नगरसेवकांच्या आठवणी वाचायला मिळतात. तत्कालीन नगरपालिका सदस्य पो. रा. शहा यांची जकात चोरी पकडण्यासंबंधीची एक मजेदार आठवण या ग्रंथात शब्दबद्ध केली आहे. शहा १९२८ ते ४२ या कालखंडात सदस्य होते. ते एक दिवस पर्वती परिसरात सकाळी फिरायला गेले असताना संशयावरून त्यांनी एका गाडीवानाला हटकले. तसा गाडीवान मुंडाशात पावतीची शोधाशोध करू लागला; पण संशय खरा ठरला आणि शहा यांनी पावतीचा फारच आग्रह धरल्यावर गाडीवान म्हणू लागला की ‘भाव ठरल्यापरमानं पैसे दिल्यात.’
अधिक चौकशी केल्यावर नाका कारकुनाला सहा आणे दिल्याचे गाडीवानाने कबूल केले. अखेर शहा त्या गाडीवानाला घेऊन नाक्यावर गेले, तर पैसे घेणारा कर्मचारी उडवाउडवी करू लागला. जकात निरीक्षकाने या प्रकरणाचा निवाडा केला आणि मुख्य अधिकाऱ्याने कारकुनाला कामावरून काढून टाकले. हे प्रकरण एवढय़ावर संपले नाही, तर नगरपालिकेवर नवा अध्यक्ष आल्यानंतर त्या कारकुनाला पुन्हा रुजू करून घेण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune octroi history of 156 years
Show comments