पुण्यात देश-विदेशातील कंपन्या कार्यालये सुरू करीत आहेत. यामुळे पुण्यातील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेतील तेजी कायम आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कार्यालयीन जागांचे व्यवहार उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यालयीन जागांची बाजारपेठ ही त्या शहरातील कंपन्यांचा विस्तार कसा होत आहे, हे दर्शविणारी असते. गेल्या वर्षी पुण्यात कार्यालयीन जागांचे ८० लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. आधीच्या वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी या व्यवहारांमध्ये १९ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत कार्यालयीन जागांना मोठी मागणी होती आणि दुसऱ्या सहामाहीत मागणीत फार वाढ झाली नाही. परंतु, ती स्थिर राहिल्याचे चित्र नाइट फ्रँक इंडियाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

कार्यालयीन जागा घेणाऱ्यांमध्ये देशातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि जागतिक पातळीवरील कंपन्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. देशातील तंत्रज्ञान कंपन्यांसोबत बहुराष्ट्रीय कंपन्यांना जागतिक सुविधा केंद्रांसाठी पुणे आकर्षक ठिकाण ठरत आहे. त्यातही मोक्याच्या ठिकाणी कार्यालयीन जागा घेण्यास कंपन्या पसंती देत आहेत. त्यात खराडीचा प्रामुख्याने समावेश आहे. गेल्या वर्षी कार्यालयीन जागांमध्ये ५७ लाख चौरस फुटांच्या नवीन जागांची भर पडली. गेल्या वर्षी नवीन जागांच्या पुरवठ्यात ५८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. यामुळे कार्यालयीन जागांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून आला आहे. पुण्यात कार्यालयीन भाड्यात गेल्या वर्षी ५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मासिक सरासरी भाडेदर प्रतिचौरस फूट ७७ रुपये आहे. करोना संकटापूर्वीची पातळी भाड्याने आता ओलांडलेली आहे.

हेही वाचा >>> देशात विकास दरात घसरण होत असताना पुण्यातील उद्योगांचे आश्वासक चित्र! एमसीसीआयएच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

को-वर्किंग स्पेस म्हणजेच कार्यालयीन जागा सहकार्याला पुण्यात दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. गेल्या वर्षी झालेल्या एकूण कार्यालयीन जागा व्यवहारांपैकी ३५ टक्के व्यवहार कार्यालयीन जागा सहकार्याचे आहेत. यामुळे कार्यालयीन जागा सहकार्यातील वाढीत कार्यालयीन जागा सहकार्याचा मोठा वाटा आहे. पुण्यात नवउद्यमी परिसंस्थेचा याला सर्वाधिक हातभार लागत आहे. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून कामासोबत कार्यालयात येऊन काम करण्याची संमिश्र पद्धत लागू केली आहे. त्यामुळे कार्यालयीन जागा सहकार्याला मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी कार्यालयीन जागा सहकार्याचे २८ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले. त्याआधी २०२३ मध्ये १३ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले होते. गेल्या वर्षी त्यात तब्बल ११२ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

हेही वाचा >>> शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…

कार्यालयीन जागा व्यवहारांतून पुण्याचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित झाले आहे. देशातील प्रमुख महानगरांचा विचार करता पुण्याचे सहावे स्थान आहे. त्यात बंगळुरू १.८१ कोटी चौरस फुटांसह आघाडीवर आहे. दिल्ली १.२७ कोटी चौरस फुटांसह दुसऱ्या स्थानी आणि मुंबई १.०४ कोटी चौरस फुटांसह तिसऱ्या स्थानी आहे. कार्यालयीन जागा व्यवहारात पुण्याची वेगाने घोडदौड सुरू आहे. पुण्यात येणाऱ्या कंपन्यांमुळे नोकरीच्या संधी निर्माण होण्यासोबत पुण्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे. यामुळे पुण्याचे पाऊल गेल्या वर्षी पुढे पडले आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune office space market soars by 19 percent in 2024 pune print news stj 05 zws