बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याची बतावणी करुन सनदी लेखापाल तरुणीला सायबर चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याबाबत एका तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सायबर चोरटे उत्तमकुमार लक्ष्मीधर भुयान (रा. ओदीशा), नाथ सिंग (रा. उत्तराखंड) यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तरुणी सनदी लेखापाल प्रशिक्षणार्थी म्हणून एका संस्थेत काम करते. तरुणीच्या बँक खात्यातून साडेचारशे रुपये काढण्यात आल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर तिने पैसे नेमके कुठे खर्च झाले, याबाबतची माहिती घेण्यासाठी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात संपर्क साधला आणि विचारणा केली. सायबर चोरट्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातील क्रमांकाऐवजी स्वत:चा क्रमांक तेथे टाकला होता. चोरट्यांनी तरुणीला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तरुणीने ॲप डाऊनलोड केल्यानंतर चोरट्यांनी तिच्या बँक खात्यातून एक लाख ४६ हजार रुपये लांबविले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.