दोन गटांत झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी सळी मारून आणि गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी किरण दिलीप मोरे (वय २६, रा. कोरेगाव पार्क) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात सूरज दिगंबर शेजवळ (वय २७, रा. आंबेगाव खुर्द) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मानव कर्पे (वय २४, रा. बालाजीनगर) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास कात्रज येथील हॉटेल मस्तानसमोर घडली.
हे देखील वाचा – पुण्यातील पाषाण तलाव परिसरात अविवाहित जोडप्यांना बंदी
घटनेच्या दिवशी आरोपी किरण मोरे आणि सूरज शेजवळ यांनी फिर्यादीला अडविले. ‘तू आमच्या भांडणात का आलास, आम्ही तुला जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणत किरण मोरे याने फिर्यादी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला आणि सूरज शेजवळने त्याचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका कधी?; रखडलेले उड्डाणपूल, नागरिक हैराण
या प्रकरणात पोलिसांनी किरण मोरेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.