पुणे : देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत येत्या प्रजासत्ताक दिनापासून (२६ जानेवारी) राज्यातील शाळांमध्ये उपक्रम राबवण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यात ध्वजावंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, नृत्य, खेळ असे उपक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन, राज्यगीत गायन, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे वाचन, देशभक्तिपर गीत गायन करावे. शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढावी. विद्यार्थ्यांकरिता स्वातंत्र्यसैनिक, देशभक्ती, लोकशाही अशा विषयांवर भाषण स्पर्धा आयोजित करावी. विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या किंवा इतर कवींच्या देशभक्तिपर कवितांचे वाचन करावे. विद्यार्थ्यांकरिता देशभक्तिपर गाण्यांवर नृत्य स्पर्धा, देशभक्तिपर विषयांवर चित्रकला, निबंध स्पर्धा आयोजित करावी. विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खेळ आयोजित करावेत. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, चित्रकला इत्यादी कलांची प्रदर्शनी आयोजित करावी. संबंधित कार्यक्रम आयोजित करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करावा.
हेही वाचा…शालेय पोषण आहाराचे लेखापरीक्षण; खर्चाची माहिती ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश
या उपक्रमांसाठी गावातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, प्रतिष्ठित नागरिकांचा सक्रिय सहभाग घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. दिलेल्या सूचनांप्रमाणे शाळांकडून प्रजासत्ताक दिन साजरा होण्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षकांनी काळजी घेण्याचेही नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा…बनावट कागदपत्रांद्वारे ४९६ कोटींची कर चुकवेगिरी,जीएसटी कार्यालयाकडून तक्रार; दोघांविरुद्ध गुन्हा
शाळांमध्ये उपक्रमांचा अतिरेक
शाळांमध्ये आधीच अनेक उपक्रम राबवावे लागत असल्याने शिक्षण विभागाच्या या सूचनांबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘सक्ती करून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देता येत नाही. अलीकडे शाळांमध्ये उपक्रमांचा अतिरेक होतो आहे. आयत्या वेळी आणि वर्षभर भारंभार उपक्रम करण्यापेक्षा वर्षभरात करायच्या उपक्रमांचे वेळापत्रक निश्चित करावे. स्थानिक परिस्थितीनुसार त्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य शाळांना असावे,’ असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी मांडले. तर, २६ जानेवारीला अनेक शाळांमध्ये स्नेहसंमेलन असते. शासन निर्णयाने या उपक्रमांना वैधानिक रूप दिले आहे. सहशालेय उपक्रमांच्या नावाखाली वर्षभरात शाळांमध्ये होणाऱ्या उपक्रमांची संख्या बरीच जास्त आहे. त्यामुळे शिकण्या-शिकवण्याला वेळ मिळण्यासाठी वर्षभरातील उपक्रमांची संख्या मर्यादित करण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सांगितले.