स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत शहरात वितरण करण्यासाठी मागविण्यात आलेल्या पाच लाख झेंड्यांपैकी चार लाख झेंडे निकृष्ट असल्याने ते परत पाठविण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे. दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत नव्याने झेंडे उपलब्ध होतील, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पाच लाख तिरंग्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३०० केंद्रेही त्यासाठी करण्यात आली आहेत. महापालिककडे टप्प्याटप्याने झेंडे उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार वाटपाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून झेंड्यांचे वितरण करण्यासाठी तीनशे केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्याद्वारेही वाटप केले जाईल.
देशाला स्वातंत्र मिळालेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेकडूनही हर घर तिरंगा उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी पाच लाख झेंड्यांची खरेदी महापालिका करणार आहे. खरेदी केलेल्या झेंड्यांचे नागरिकांना विनामूल्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी ८५ लाख रुपयांच्या खर्चालाही मान्यात देण्यात आली आहे. शहरातील अनेक संस्था, स्वयंसेवी संस्थांकडून महापालिकेकडे झेंडे उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही झेंडे खरेदीसाठी दोन लाखांपर्यंतचा खर्च करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या नियमानुसार सुती कापडासह पाॅलिस्टर आणि अन्य कापडाच्या झेंड्यांना मान्यता देण्यात आली आहे. सुरत, अहमदाबाद येथून तिरंग्यांचा पुरवठा होत आहे. झेंडे पाठविण्यात आले असले तरी हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत झेंड्यांचे वितरण करण्यास अजून काही कालावधी आहे. त्यापूर्वी उत्कृष्ट दर्जाचे झेंडे महापालिकेला प्राप्त होतील, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. दरम्यान, यासंदर्भात मोहिमेचे समन्वयक सचिन इथापे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
झेंड्यांमध्ये दोष कोणते? –
महापालिकेकडे टप्याटप्याने झेंडे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. मात्र ते निकृष्ट दर्जाजे, डाग पडलेले, अशोकचक्र मध्यभागी नसलेले आहेत, ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शानास आली. त्यामुळे खराब झालेले झेंडे ठेकेदाराला परत पाठविण्यात आले आहेत. शासनाकडूनही मिळालेले अडीच लाख झेंडेही परत करण्यात आले आहेत. काही झेंड्यांवर रंगांचे डाग पडले असून कापड अस्वच्छ तसेच शिलाई व्यवस्थित नसल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे ठेकेदारांकडील दोन लाख तर शासनाकडील दोन लाख असे चार लाख झेंडे परत पाठविण्यात आले आहेत.