: यजमान पुणे जिल्हा संघाने ११६ सुवर्ण, ९६ रौप्य व १०५ ब्रॉंझपदके अशी एकूण ३१७ पदके मिळवीत राज्य मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. ठाणे संघाने ४७ सुवर्ण ३४ रुपये व ३७ ब्रॉंझपदके जिंकून उपविजेतेपद मिळविले. ठाण्याचा ऋषभ दास (जलतरण) व पुण्याची श्रद्धा तळेकर (जिम्नॅस्टिक्स) यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.
हेही वाचा- संक्रांतीपर्यंत थंडी आणखी वाढणार; मुंबई, कोकणातही गारव्यात वाढ
शिवछत्रपती क्रीडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारोप समारंभात विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे खजिनदार सहदेव यादव, महाराष्ट्र बँकेचे सरव्यवस्थापक राजेश सिंग, राज्याचे क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
हेही वाचा- लोणावळ्यातील वाहतूककोंडी सुटणार; आठ दिवसांत आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
राव म्हणाले की, शासन खेळाडूंसाठी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असते. त्याचा लाभ घेत व सर्वोच्च ध्येय ठेवीत देशाचे नाव उंचवावे हीच आमची अपेक्षा आहे. अशा क्रीडा स्पर्धांमधून ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू होतील अशी मला खात्री आहे. त्यासाठी खेळाडूंच्या पालकांचे योगदानही महत्त्वाचे आहे.
पुढील वर्षी या क्रीडा संकुलात जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेचे आयोजन केले जाईल. जर भविष्यात भारताला ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळाले, तर ती स्पर्धा पुणे शहरातच होईल, यासाठी आमचा प्रयत्न राहील. खेळाडूंनी उत्तेजक सेवनाचा मार्ग न स्वीकारता प्रामाणिकपणे कष्ट करीत यश मिळवावे, असे यादव म्हणाले. यावेळी महिवाल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. दिवसे यांनी प्रास्ताविक, तर शिरगावकर यांनी आभार मानले.