पुणं बदललं! पुण्यातली शिस्त हरवलिय, सुरक्षितता हरवली आहे, सौंेदर्य हरवलंय. चार कुटुंबांचं एकत्र घर हरवलं आहे. पुणेरीपणच हरवलंय, पुणेरीपणातलं निरागसपण हरवलंय! माझं पुणं कुठेतरी हरवत चाललंय.
पुण्यातले वाडे गेले आणि पुण्याच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग संपला. मी थत्ते वाडय़ात राहात असे; या वाडय़ात आम्ही पाच बिऱ्हाडकरू होतो. त्या वाडय़ाच्या खिडकीतून दिसणारं माझं पुणं मला आता दिसत नाही. माझ्या लहानपणी दारावर वासुदेव, पिंगळा, होरा यायचे, ताडगोळेवाला यायचा, बोहारणी यायच्या. या बोहारणी आमच्या वाडय़ाच्या बाहेर असलेल्या नळावर रोज दुपारी जेवायला बसायच्या. मग, कुणाला कसं गंडवलं, एकाच डब्याच्या बदल्यात जरीची साडी कशी घेतली अशा त्यांच्या गप्पा चालायच्या. कधी कधी वाडय़ाच्या दारासमोर चुलीवर बासुंदी करून देणारा एक माणूस असायचा. हे सगळं पुण्यातच होतं. त्या वेळी वाडय़ात राहणारे सगळे हे एका कुटुंबासारखे होते. या वाडय़ांनी आणि एकत्र कुटुंबातूनच जातीभेद न मानण्याचे, एकमेकांचा विचार करण्याचे, एकमेकांना समजून घेण्याचे, आपला आनंद वाटून घेण्याचे संस्कार केले. आज शेजाऱ्याकडे पाणी मागतानाही माणसं विचार करतात. त्या वेळी सगळे सण एकत्र साजरे होत होते. प्रत्येक वाडय़ात रंगपंचमीच्याच दिवशी रंगपंचमी खेळली जात होती. गणेशोत्सवामध्ये साधेपणामध्येही खूप सौंदर्य होतं. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीचं स्वरूपही शुद्ध होतं. आजच्यासारखा गोंगाट, धांगडधिंगा यांनी भरलेलेल्या मिरवणुका नव्हत्या. गणपतींचं विसर्जन होताना, मन खरच भरून येत होतं. प्रत्येक घरातून होणारा दिवाळीचा फराळ, किल्ला, दिवाळीच्या दिवशी पहिला फटाका लावून वाडय़ाला जाग कोण आणतो याची स्पर्धा, या सगळ्यात एक मजा होती. एक निरागसपणा होता. काळानुरूप वाढलेल्या समृद्धीने आणि सोयी-सुविधांनी ही मजाच हरवून गेली आहे. पुण्यातल्या मंडईत भाजी घेणं, ही सुद्धा एक मजा होती. आज चिरलेली भाजी घरी येते. बेडेकरांची मिसळ, श्री मिसळ, श्रीकृष्ण इथे जमणारे अड्डे, तिथल्या पाटय़ा ही खरी पुण्याची ओळख. आता जिकडे-तिकडे सब वे, मॅकडोनाल्ड सुरू झाली. मात्र, त्याची गोडी पुणेरी मिसळीला नाही. थिएटरचं पुणं गेलं, मराठी चित्रपटांचं पुणं गेलं. मल्टीप्लेक्सच पुणं आलं.
सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख टिकली आहे. पुण्यात सतत सुरू असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी ही ओळख टिकवून ठेवली आहे. पण कार्यक्रमाचा गोडवा मात्र टिकला नाही. सवाई गंधर्व संगीत महोत्सव आता मोठा उत्सव झाला आहे. पण पूर्वी या महोत्सवाचा दिमाख काही वेगळाच होता. देशातील अनेक दिग्गज इथे यायचे. श्रोतेही जाणकार असायचे. मनापासून दाद देण्याचा उमदेपणा होता. व्याख्यानं, सभा हा पुण्याचा आत्मा होता. विठ्ठलराव गाडगीळ, बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा, पुण्यातल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानमाला यांचे संस्कार पुणेकरांवर होते. आजही व्याख्यानमाला होतात, त्याला थोडीफार गर्दीही असते; पण ती बौद्धिक गरज म्हणून नाही. कारण व्याख्यानाला तुडुंब गर्दी व्हावी अशी व्यक्तिमत्त्वंही कमी झाली. आज जुन्या शाळांची मजाही गेली. काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमाच्या, चकाचक शाळा सुरू झाल्या. पण पूर्वीच्या नूमवि, रमणबाग, न्यू इंग्लिश स्कूल, भावे हायस्कूल या शाळांमध्ये आत्मीयतेने शिकवणारे शिक्षक, त्यांची शिस्त, संस्कार सगळं गेलं. चांगले शिक्षक आजही असतील, पण एकूणच शिकवण्याची तळमळ आणि कडक शिस्त आज दिसत नाही हे वास्तव आहे.
विद्यापीठ, पाषाण तलाव, पेशवेबाग, पर्वती, टेकडय़ा ही आमची फिरायला जाण्याची ठिकाणं होती. पुण्याचं निसर्गसौंदर्य हे एक वैशिष्टय़ होतं. आज पर्वती काय किंवा बाकीच्या टेकडय़ा काय, अध्र्याहून अधिक झोपडय़ांनी वेढलेल्या दिसतात. वेताळ टेकडी, हनुमान टेकडी इथली झाडी संपली, नदीची गटारगंगा झाली. पूर्वीचं हिरवंगार पुणं आता दिसतच नाही. पुण्यात पूर्वी खूप मैदानं होती. या मैदानांवर खेळून आम्ही मोठे झालो. त्या वेळी सारसबागेजवळचं सणस ग्राऊंड हे आम्हाला खूप लांब वाटायचं. पुणं चारी बाजूने विस्तारलं, अवाढव्य झालं. पण त्याचवेळी पुण्याची शिस्त संपली. लांब वाटणारा सिंहगड अगदी पुण्याच्या जवळ आला. तो एक पिकनिक स्पॉट झाला. पण त्याचा इतिहास आम्हाला माहित नाही. आज आम्हाला पुण्याचा इतिहास समजावून सांगणारं कोणीच नाही. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाला नुकतीच चाळीस वर्ष पूर्ण झाली. पण घाशीराम कोतवालाची कालपर्यंत असलेली चावडी जपण्याचं आपल्या लक्षात आलं नाही.
हे सगळं पुण्याचं वैभव होतं. याच वैभवात ‘पुणेरी’पण होतं. आज तेच नेमकं हरवलं. पूर्वी सगळं पुणं एकत्र कुटुंबासारखं होतं. आज प्रत्येक घरही हॉटेलसारखं व्हायला लागलं आहे. यातून माणसं दूर गेली आणि पुणं व्यवहारी, हिशोबी झालं. पुण्यात बाहेरचे लोंढे आले आणि पुण्यातली शिस्त, सौंदर्य, सुरक्षितता गेली. पूर्वीही पुण्यात गुन्हे घडत होते. माणसात गुन्हेगारी प्रवृत्ती असते म्हणून ती पुण्यात होती. पण आजच्यासारखं ‘गुन्हेगारी’ हे पुण्यासमोरचं आव्हान नव्हतं. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट हे कल्पनातीत होतं. साधारण ७९-८०मध्ये पाकिस्तानचा क्रिकेट संघ पुण्यात सामन्यासाठी आला होता. त्या खेळाडूंना हिंदी चित्रपटांचं आकर्षण होतं. आम्ही त्या वेळी देवधर स्टेडियमवर क्रिकेट खेळायला जायचो. त्यामुळे या संघाला चित्रपट दाखवायला नेण्याचं काम हे आमच्याकडे होतं. आम्ही ‘सरगम’ चित्रपटासाठी वसंत टॉकिजची अख्खी बाल्कनी बुक केली होती आणि या संघाने अगदी मजेत चित्रपट पाहिला होता. त्या वेळी सुरक्षा, दहशतवाद असं काही कुणाच्या खिजगणतीतही नव्हतं. पुण्यात कुठेही अगदी आपल्या घरात असल्यासारखं उबदार, सुरक्षित वाटत होतं.
झालेली प्रगती ही महत्त्वाची आहेच. काळानुसार बदल हा होणार हेही साहजिक आहे. पण तो माणूसपणाच्या किमतीवर नाही. पुण्यात औद्योगिक प्रगती झाली, पुण्याची आर्थिक गणितं बदलली, छानछोकी वाढली. पण या सगळ्याचा फटका पुणेरीपणाला बसला. झालेल्या बदलांकडे पाहताना गंमतही वाटते कधीकधी, पण माझं पुणं हरवलं याचं दु:ख जास्त होतं. या बदलांचा परिणाम माणसामाणसाच्या नात्यावर झाला. छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा पुणेकरांमध्ये ताण वाढला, मग समोरची गाडी आडवी आली म्हणून रस्त्यावर भांडणं व्हायला लागली. ही पुण्याची संस्कृती नव्हती. माझं पुणं हे कुणाच्याही हाकेला ओ देणारं, मदतीला धावून जाणारं होतं. आज गवताची गंजी सोडली, की गवत जसं झटकन विखुरतं, तसं पुण्याचं झालंय. माणसामाणसातले बंध तुटले आणि पुणं विखुरलं. बदल पुण्यात झाला, तसा सगळीकडेच झाला. पण पुण्यात हा सगळा बदल खूप झपाटय़ाने झाला. तो लक्षात येण्याइतका झाला. त्याला कारणीभूतही आपणच! या बदलांच्या मागे धावत सुटलो. पुणेकरांनी या सगळ्याकडे आतातरी गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. आता जे हातात आहे, ते जिवापाड जपण्याची गरज आहे. ‘आपलं पुणं’ खरच राहिलय का याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची ही वेळ आहे. आपलं हरवेलेलं पुणं शोधण्याची गरज आहे. हे जुनं पुणं पुन्हा उभं करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. नवे प्रयोग करून पाहण्याची गरज आहे.
पुणं बदललं असलं, तरी पुण्यावर माझं प्रेम आहे. पुणं हे माझं घर आहे. या पुण्यानेच मला आयुष्यातला खूप सुंदर काळ दिला आहे. पुण्यानेच माझ्यावर संस्कार केले आहेत. शंकर अभ्यंकर, भालेराव सर, जांभोरकर सर यांसारखे शिक्षक मला पुण्याने दिले. पुणं बदललं म्हणून मी निराश नाही. मी आशावादी आहे. हे एक चक्र आहे. माझं हरवलेलं पुणं मी शोधतोय. माझं हरवलेलं घर शोधतोय. अगदी पूर्वीसारखं नाही, तरी जुनं पुणं, माझं पुणं मला पुन्हा मिळेल. सुंदर, सुरक्षित, सुसंस्कृत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा