घरबसल्या आणि कोणत्याही ठिकाणाहून वीजबिलांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्यात पुणेकर ग्राहक राज्यात आघाडीवर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर वीजग्राहकांनी हा पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकही आता मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत आहेत.
हेही वाचा- पुण्यातील ५६ लाख नागरिक वीजबिलाच्या रांगेतून बाहेर, तीन महिन्यांत तब्बल १३७५ कोटींचा ऑनलाइन भरणा
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये ऑनलाइन वीजबिल भरण्याचा पुणेकरांचा प्रतिसाद आणखी वाढला आहे. पुणे शहरातील ३१ लाख ५६ हजार ६९ लघुदाब वीजग्राहकांनी ७४० कोटी ४० लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक ५ लाख २८ हजार २४८ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये दरमहा सरासरी ४ लाख ३८ हजार वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली आहे.
हेही वाचा- पुणे: एसटीचा अपघात टाळण्यासाठी २४ हजारांहून अधिक चालक सज्ज; अपघातांची कारणे शोधून उपाययोजना
पिंपरी- चिंचवड शहरामध्ये गेल्या तिमाहीत लघुदाब घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक १४ लाख ७७ हजार ग्राहकांनी ३७५ कोटी ६५ लाखांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. गेल्या तीन महिन्यांत पिंपरी विभागातील ८ लाख ६५ हजार ९५३ तर भोसरी विभागातील ६ लाख ११ हजार ८७७ ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ९ लाख ६० हजार ५६८ ग्राहकांनीही २६० कोटी रुपयांचे वीजबिल ऑनलाइन भरले आहे.