इतिहासाचा अभिमान आणि नव्याची जाण असलेले पुणेकर मतदार हे मतदानाबाबत नेहमी चोखंदळ राहिले आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार लादला, तर पुणेकर त्याला योग्य ‘जागा’ दाखवितात. पुणेकरांच्या या सवयीचा धसका राजकीय पक्षांनी घेतला असल्याने पुण्यात घराणेशाहीला फारसा थारा नसल्याचे दिसते. आजवर झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काही अपवाद वगळता बहुतांश लोकप्रतिनिधी हे घराणेशाहीचा शिक्का नसलेले निवडून आलेले आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर घराणेशाहीतून नगरसेवक निवडून येत असले, तरी त्यांना लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उभे करण्याचे धाडस राजकीय पक्षांनी केलेले दिसत नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतही राजकीय वारशाऐवजी सामाजिक कार्याचा वसा पाहूनच उमेदवारी देण्यावर राजकीय पक्षांचा कल असणार आहे.

पुण्यात जेमतेम ५० टक्केच मतदार मतदान करतात. त्याबाबत कायम टीका केली जाते. मात्र, हे ५० टक्के मतदार उमेदवार निवडताना कायम उमेदवार कोण आहे आणि त्याची कार्यक्षमता पाहून मतदान करत आले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी कोणताही उमेदवार आयात करून तो लादण्याचा प्रयत्न केला, तर पुणेकर मतदार त्यांना घरचा मार्ग दाखवितात. त्यामुळे राजकीय पक्ष हे पुण्यात उमेदवार देताना या सर्वांचा विचार करत आले आहेत.

हेही वाचा – ‘भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी’; महेश लांडगे यांनी दोन माजी महापौरांसह ठोकला शड्डू

सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा, तसेच खडकवासला आणि हडपसर या आठ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यास घराणेशाहीतून आलेले शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थ शिरोळे आणि हडपसरमधील चेतन तुपे हे दोनच आमदार निवडून आलेले दिसतात. हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार असले, तरी ते लादलेले उमेदवार नसल्याची या मतदारसंघातील मतदारांची भावना असल्याने पहिल्याच निवडणुकीत ते निवडून आलेले दिसतात. शिरोळे यांचे वडील माजी खासदार अनिल शिरोळे यांची राजकारणातील स्वच्छ प्रतिमा सिद्धार्थ शिरोळे यांच्या पथ्यावर पडलेली दिसते. अनिल शिरोळे यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणूनही उत्तम काम केलेले आहे. त्यामुळे शिवाजीनगरमधील मतदारांनी त्यांना स्वीकारले. चेतन तुपे यांचे वडील दिवंगत खासदार विठ्ठल तुपे यांचीही राजकारणातील प्रतिमा चांगली होती. त्यामुळे हडपसरमधील मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विजयी केले.

पुण्याचे पहिले खासदार काकासाहेब गाडगीळ यांचा वारसा दिवंगत खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांनी समर्थपणे चालविला. विठ्ठलराव गाडगीळ यांना राजकीय वारसा असला, तरी त्यांनी स्वकर्तृत्वाने पुण्यावर प्राबल्य राखले होते. अन्य खासदारांपैकी अनिल शिरोळे यांना राजकीय वारसा आहे. शिरोळे घराण्यातील भा. ल. शिरोळे हे १९५७-५८ या कालावधीत महापौर होते. मात्र, अनिल शिरोळे यांना राजकीय आणि सामजिक कामाने यश मिळवून दिले.

हेही वाचा – विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा; एकाविरुद्ध गुन्हा, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर घबराट

महापालिका स्तरावर काही प्रमाणात पुण्यात घराणेशाही दिसून येते. वडिलांनंतर मुलाला उमेदवारी देऊन नगरसेवक म्हणून निवडून आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. पुणे नगरपालिका असताना पुण्यावर सहा घराण्यांचा प्रभाव होता. त्यामध्ये मुदलियार, नाईक, शिरोळे, फुलंब्रीकर, बारणे आणि सणस ही घराणे होती. १८८३ पासून १९५७ पर्यंतचा काळ पाहिल्यास घरमालक, कंत्राटदार आणि व्यापारी हे तत्कालीन नगरपालिकेत निवडून येत होते. नंतरच्या काळात राष्ट्रीय चळवळ आणि सत्यशोधक चळवळींमुळे स्थित्यंतरे घडत गेली आणि विविध क्षेत्रांतील उमेदवार निवडून येऊ लागले. कालांतराने नगरपालिका आणि महापालिकेमध्ये घराणेशाही दिसून येऊ लागली. पत्नी, मुलगा, मुलगी किंवा आपल्याच कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे प्रमाण वाढीस लागलेले दिसते. महापालिकेत घराणेशाहीचा अवलंब करणारे राजकीय पक्ष लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही टाळण्यावर भर देत आले आहेत. त्यामुळे पुण्यात घराणेशाहीला फारशी जागा नसल्याचे चित्र आहे. उमेदवार लादला की पुणेकर उमेदवाराला योग्य ‘जागा’ दाखवितात, हे राजकीय पक्षांना चांगलेच ठाऊक आहे.

sujit.tambade@expressindia.com