पुणे : पुणे हे आता दुचाकींचे शहर बनले आहे. शहरातील एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्क्यांहून अधिक आहे. मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षातही पुणेकरांचा कल दुचाकी खरेदीकडे राहिल्याचे समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षात दुचाकी विक्री १ लाख ८५ हजार ६६६ आहे. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात सुमारे ८५ हजारांनी वाढ झाली आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एकूण वाहनांची विक्री १ लाख ७० हजार ५३७ होती. ती २०२२-२३ मध्ये २ लाख ९२ हजार २५९ वर पोहोचली आहे. मागील वर्षभरात वाहन विक्रीत सुमारे १ लाख २० हजारांहून अधिक वाढ झाली आहे.
एकूण वाहनांमध्ये दुचाकी विक्रीचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. वाहन विक्रीत दुचाकींची संख्या १ लाख ८५ हजार ६६६ आहे. वर्षभरात दुचाकींच्या विक्रीत सुमारे ८५ हजाराने वाढ झाली आहे. त्याआधीच्या वर्षात दुचाकी विक्री १ लाख १ हजार ४९८ होती. दुचाकीनंतर मोटारींची विक्री दुसऱ्या स्थानी आहे. मोटारींची विक्री ७६ हजार ६२४ आहे. वर्षभरात त्यात सुमारे ५० टक्के म्हणजेच २५ हजारांची वाढ झाली आहे. मोटारींची विक्री २०२१-२२ मध्ये ५१ हजार ४७८ होती.
मालवाहू वाहनांची विक्री ११ हजार ७४६ आहे. वर्षभरात त्यात सुमारे दोन हजारांची वाढ झाली आहे. त्याआधीच्या मालवाहू वाहनांची विक्री ९ हजार ६७४ होती. बसची विक्री ८९९ असून, तिच्या विक्रीत जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. त्याआधीच्या वर्षात बसची विक्री केवळ ३५० होती. इतर वाहनांची विक्री ८ हजार ६६८ आहे. त्याआधीच्या वर्षात ही विक्री ३ हजार ९५३ होती. इतर वाहनांच्या विक्रीत जवळपास दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
हेही वाचा – पुण्यात ओला कॅबचालकाचे प्रवासी महिलेशी अश्लील चाळे; कॅबचालकाविरुद्ध गुन्हा
रिक्षांच्या विक्रीत तिप्पट वाढ
रिक्षांच्या विक्रीतही जवळपास तिप्पट वाढ झाली आहे. रिक्षांची विक्री २०२१-२२ मध्ये ३ हजार ५८४ होती. त्यात वर्षभरात सुमारे साडेसहा हजाराने वाढ झाली आहे. रिक्षांची विक्री २०२२-२३ मध्ये ९ हजार ५६ वर पोहोचली आहे.
पुण्यातील वाहन विक्री (एप्रिल २०२२-मार्च २०२३)
- दुचाकी : १,८५,६६६
- मोटार : ७६,२२४
- मालवाहू वाहने : ११,७४६
- रिक्षा : ९,०५६
- बस : ८९९
- इतर वाहने : ८,६६८
- एकूण : २,९२,२५९