नेता कोणाला म्हणायचे? ज्याच्या मागे-पुढे कार्यकर्त्यांचा लोंढा असणारा, मंत्री नसला तरी एखादा तरी पोलीस संरक्षणासाठी असणारा आणि खासगी अंगरक्षक म्हणजे ‘बाउन्सर’ आजूबाजूला उभे करून मगच ऐटीत चालणारा. त्याशिवाय पुढारी किंवा नेता असल्याची छाप पडत नाही, असा सध्याच्या राजकीय पुढाऱ्यांचा समज झाला आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचा कोणत्या तरी शहरातल्या गल्लीतल्या शाखेचा अध्यक्ष असलेला पदाधिकारीही याच थाटात समाजात आणि आजूबाजूला वावरत असतो. पण पुण्यासारख्या शहराला पूर्वी ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’चे लोकप्रतिनिधी मिळाले आहेत. राजकारणात असूनही कोणताही बडेजाव नसलेले अनेक नेते पुण्याने अनुभवले आणि त्यांचे नेतृत्व पुणेकरांनी स्वीकारले. त्यांनी दाखविलेल्या मार्गावरून आजवर पुण्याचे राजकारण सुरू होते; पण आता आदर्श लोकप्रतिनिधींचा पुण्यातील राजकारण्यांनाही विसर पडल्याने ‘बाउन्सर’च्या तटबंदीत मतदारांशी दुरून संपर्क साधणाऱ्या पुढाऱ्यांची चलती आहे.
पूर्वीच्या आणि आताच्या राजकीय नेत्यांच्या विचारसरणीमध्ये आता कमालीचा फरक पडला आहे. पूर्वीची नेतेमंडळी ही सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणारी होती. त्यांच्या राहणीमानातही साधेपणा असायचा. पद असले तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यात अंतर नसायचे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची मतदारांवर छाप असायची. एखाद्या नागरिकाची समस्या सुटत नसेल, तर स्वत: तत्कालीन नगरपालिका किंवा महापालिकेत जाऊन प्रश्नाची सोडवणूक करण्याची भूमिका लोकप्रतिनिधींची असायची. पदावरून पायउतार झाल्यानंतर आपण कोणत्या पदावर होतो, हे विसरून पूर्वीप्रमाणे सामान्य नागरिकांप्रमाणे राहणारे लोकप्रतिनिधी होते. नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषविले असले, तरी वैयक्तिक कामासाठी नगरपालिकेत सर्वसामान्य नागरिकांसारखे रांगेत उभे राहणारे लोकप्रतिनिधी पुण्याने पाहिले आहेत. साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे तत्कालीन पुण्यातील मोठी असामी होती. ते दोन वेळा नगराध्यक्ष होते. १९१८-१९ आणि १९२२ ते १९२५ हा त्यांचा कालावधी होता. म्हणजे १०० वर्षांपूर्वी पुणे ही नगरपालिका असताना केळकर हे नगराध्यक्ष म्हणून पुण्याचे नेतृत्व करत होते. त्यांच्याविषयी तत्कालीन नगरपालिकेतील अधिकारी स. के. नेऊरगावकर यांनी १९४२ मधील प्रसंगाची नोंदविलेली आठवण ही सध्याच्या राजकारण्यांसाठी लोकप्रतिनिधीची साधी राहणी कशी असावी आणि नेता कोणाला म्हणायचे, हे दाखविणारी आहे. केळकर यांच्या स्वत:च्या घरासंबंधी काहीतरी काम असल्याने ते नगरपालिकेत आले होते. आपण नगराध्यक्ष म्हणून सन्मानाचे पद भूषविले होते, याचा विचार न करता ते समान्य नागरिकांप्रमाणे नगरपालिकेत येऊन रांगेत उभे राहिले. तत्कालीन नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्याविषयी माहिती नव्हती. त्याच वेळी नेऊरगावकर तेथून जात असताना त्यांनी केळकर यांना पाहिले आणि नगराध्यक्षांच्या खोलीत नेऊन सन्मानाने तेथे बसविले. मात्र, तरीही त्यांना याबाबत संकोच वाटला आणि त्यांनी स्वत:च्या कामासाठी रांगेत उभे राहण्याचा कमीपणा वाटण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले. हा एक प्रसंग सध्याच्या राजकारण्यांसाठी आदर्श नेता कसा असतो, हे दाखविण्यासाठी पुरेसा आहे.
हेही वाचा – पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त
शंकरराव कानिटकर हे १९४१-४२ मध्ये नगराध्यक्ष होते. नगराध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते नगरपालिकेत आले नाहीत. खासगी कामासाठी नगरपालिकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला त्यांनी कधीही घरी बोलाविले नाही. खासगी कामासाठी अधिकाऱ्यांना शिवीगाळ किंवा दमबाजी करणाऱ्या सध्याच्या राजकारण्यांसाठीही हे उदाहरण विचार करायला लावणारे आहे. काँग्रेस पक्ष १९३८ मध्ये नगरपालिकेमध्ये बहुमताने निवडून आला. त्या वेळी नगराध्यक्षपदी आचार्य केशव नारायण शिरोळे आणि उपनगराध्यक्षपदी डॉ. बी. ए. शिरोळकर होते. अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसमध्ये फाटाफूट झाली. ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही. कारण त्या वेळचे नेते एका धोरणाने वागणारे होते. त्यामुळे दोघे पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीला कधीच उभे राहिले नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेणारे राजकारणी सर्व मतदार पहात आहेत. काहीही करून पुन्हा आमदार होण्यासाठी पळापळ करणारे हे राजकारणी आणि मनाला पटले नाही म्हणून राजकारणाला सोडचिठ्ठी देणारे लोकप्रतिनिधी हे वेगळेच होते.
sujit. tambade@expressindia. com