पुणे : जुन्या गाड्यांचे तरुणाईमध्ये असलेले आकर्षण…. विविध मोटारींसमवेत ‘सेल्फी’ घेण्यासाठी लागलेली चढओढ… गाडी चालण्यासाठी सज्ज झालेले ज्येष्ठ नागरिक अशा वातावरणात वैविध्यपूर्ण मोटारींचा ताफा पाहण्यासाठी रविवारच्या सकाळी पुणेकर रस्त्यावर आले. उत्स्फुर्त स्वागत अशा उत्साहात पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. ‘व्हिंटेज आणि क्लासिक कार रॅली’ला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विंटेज कार ट्रॉफी रवी अवेलु यांच्या ‘फोर्ड व्ही ८’ या गाडीला, तर क्लासिक कार पुरस्कार योहान पुनावाला यांच्या १९४८ मधील ‘बेंटल मार्क व्हीआय’ या गाडीला देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लब आणि रेस कोर्स टर्फ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिंटेज अँड क्लासिक कार, मोटारसायकल आणि स्कूटर फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीची सुरुवात करण्यात आली. गुप्ता आणि कर्णिक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आरडब्ल्युआयटीसीचे अध्यक्ष सुरेंद्र सणस, व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया क्लबचे अध्यक्ष नितीन डोसा, फेरीचे आयोजक सुभाष सणस, योहान पुनावाला, झहीर वकील, धनंजय बदामीकर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – उत्तरप्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पुण्यात तिघांवर खुनी हल्ला

रेसकोर्स टर्फ क्लब येथून सुरू झालेली ही फेरी गोळीबार मैदान, सारसबाग, दांडेकर पूल, लाल बहादूर शास्त्री मार्ग, गरवारे पूल, कृषी महाविद्यालय पूल, जुना बाजार रस्ता, जिल्हा परिषद, हॉलीवूड गुरुद्वारा रस्ता येथून पुन्हा टर्फ क्लब येथे समाप्त झाली. प्रत्येक चौकाचौकांत नागरिकांनी फेरीचे स्वागत केले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी थांबून या फेरीचा आनंद लुटला. पुणेरी पगडी परिधान करून पारंपरिक पेहरावात काही गाड्यांचे मालक या फेरीत सहभागी झाले होते.

फेरीत सहभागी झालेली वैविध्यपूर्ण वाहने

  • नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे
  • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला
  • हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ
  • अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज
  • विनोद खन्ना यांची दोन दारांची सिल्व्हर कलर मर्सिडीज
  •  ‘बॉबी’ फेम राजदूत मोटारसायकल
  • शेखर चवरेकर यांची १९१९ मधील ‘ओव्हर लँड’ ही सर्वात जुनी मोटार
  • १९५६ मधील ‘डॉज’, १९३८ मधील ‘नाॅटन ५००’ ही सर्वात जुनी मोटारसायकल
  • रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, फोर्ड मोटारीचा सहभाग

हेही वाचा – विमानाचे इंधन चोरणारी चोरट्यांची टोळी गजाआड; दोन कोटी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रभा नेने ‘व्हिंटेज आजी’

या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘ऑस्टिन ७’ ही भारतातील सर्वात जुनी मोटार घेऊन ८७ वर्षांच्या डॉ. प्रभा नेने स्वतः सहभागी झाल्या होत्या. ‘१९३४ सालची असलेली ऑस्टिन ७ ही गाडी माझ्या जन्मापूर्वीची आहे. १९६४ मध्ये विकत घेतली तेव्हापासून गाडी माझ्याकडेच आहे. या गाडीतून नागपूर ते पुणे असा तब्बल ८९६ किलोमीटरचा सर्वात मोठा प्रवास मी केलेला आहे. आजही त्याच उत्साहाने गाडी चालवत असून गाडीची देखभालही घेत आहे’, असे ‘व्हिंटेज आजी’ प्रभा नेने यांनी या वेळी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune people seen diverse fleet of cars huge response to the vintage and classic car rally vvk 10 ssb
Show comments