कॅन्टोन्मेंट विभागाबरोबरच महापालिका हद्दीतही पेट्रोल व डिझेलवर स्थानिक संस्था कर (एलबीटी) आकारणीस पुणे पेट्रोल डिलर असोसिएशनने विरोध केला असून, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष बाबा धुमाळ व प्रवक्ते अली दारुवाला यांनी याबाबतची माहिती दिली. कॅन्टोन्मेंट विभागांमध्ये पेट्रोल व डिझेलवर एलबीटी न आकारण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. पुणे व िपपरी- चिंचवड महापालिकांच्या क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेलवर एलबीटी आकारला जातो. पेट्रोल, डिझेल अत्यावश्यक घटकामध्ये येत असल्याने कॅन्टोन्मेंट विभागासह महापालिका क्षेत्रातही एलबीटी लावू नये, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.
पालिका क्षेत्रामध्ये सोन्यावर अत्यंत कमी प्रमाणात एलबीटी आकारला जातो. सोने अत्यावश्यक घटकांमध्ये मोडत नसतानाही त्यावर अत्यल्प एलबीटी आहे. डिझेल व पेट्रोल या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्यामुळे त्यावरील एलबीटी हटविला गेला पाहिजे. त्यातून नागरिकांनाही काहीसा दिलासा मिळू शकणार आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी बंदचा निर्णय घेण्यात आला असल्याचे दारुवाला यांनी सांगितले.

Story img Loader