पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अकरावीच्या प्रवेशासाठीची पहिल्या फेरीत ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्यात २९ हजार ८४० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी १ जुलैपर्यंतची मुदत आहे. दरम्यान, यंदा प्रवेशासाठीचे पात्रता गुण नव्वदीपारच आहेत. त्यातही कला आणि वाणिज्य शाखेच्या पात्रता गुणांमध्ये वाढ, तर विज्ञान शाखेसाठी काही ठिकाणी वाढ आणि काही ठिकाणी घट झाल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या प्रवेशाच्या वेळापत्रकानुसार पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. राज्य मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडे असते. केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३४३ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार २६५ जागा उपलब्ध आहेत. त्यातील ९३ हजार ३५६ जागा केंद्रीय प्रवेशांसाठी (कॅप), तर २६ हजार ९०९ जागा कोटा प्रवेशांसाठी आहेत. केंद्रीय प्रवेशांसाठी ७० हजार २८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीत वाणिज्य शाखेत १४ हजार २११, कला शाखेत ३ हजार ६४०, विज्ञान शाखेत २० हजार ६०४, तर व्यवसाय अभ्यासक्रमासाठी ४३५ अशा एकूण ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.

हेही वाचा : पावसाने सरासरी गाठली; पेरण्या ५२ टक्क्यांवर

नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी चढाओढ असते. त्यामुळे पात्रता गुणांचा टक्का महत्त्वाचा ठरतो. यंदा फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेसाठी ४४४, तर विज्ञान शाखेसाठी ४७४ गुण आवश्यक ठरले. गेल्यावर्षी ४२९ आणि ४७५ गुण आवश्यक होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात यंदा ४७६, तर गेल्यावर्षी ४७९ गुण आवश्यक होते. डॉ. शामराव कलमाडी महाविद्यालयात यंदा कला शाखेसाठी ४५२, वाणिज्य शाखेसाठी ४४९, विज्ञान शाखेसाठी ४६८ गुण आवश्यक राहिले. गेल्यावर्षी कला शाखेसाठी ४३९, वाणिज्य शाखेसाठी ४१८, विज्ञान शाखेसाठी ४५८ गुणांवर प्रवेश मिळाला होता. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या कला, विज्ञान शाखेच्या पात्रता गुणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फरक पडलेला नाही. यंदा कला शाखेसाठी ३३०, विज्ञान शाखेसाठी ४५४ गुण आहेत. मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे यंदा कला शाखेसाठी ३४३, वाणिज्य शाखेसाठी ४४०, विज्ञान शाखेसाठी ४५४ गुण आवश्यक ठरले. तर गेल्यावर्षी कला शाखेसाठी ३४३, वाणिज्य शाखेसाठी ४४६, विज्ञान शाखेसाठी ४६० गुण आवश्यक होते. सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेत गेल्यावर्षी ४१५, वाणिज्य शाखेत ४३१ गुण होते, तर यंदा कला शाखेसाठी ४७२, वाणिज्य शाखेसाठी ४६५ गुण आवश्यक आहेत.

दरम्यान पात्रतागुण वाढणे, कमी होणे यामागे निश्चित असा काही तर्क नाही. कारण विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, त्यांनी नोंदवलेले पसंतीक्रम, त्यांच्या पसंतीनुसार उपलब्ध असलेल्या जागा असे विविध घटक पात्रतागुण निश्चित होण्यासाठी कारणीभूत ठरतात, असे सिम्बायोसिस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषिकेश सोमण यांनी सांगितले.

हेही वाचा : भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक

कागदपत्रांअभावी प्रवे‌श नाकारू नये…

प्रवेश प्रक्रियेत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी पुढील दोन फेऱ्यांसाठी पात्र राहणार नाही. प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालय आल्यावर त्यांना कागदपत्रांअभावी प्रवेश नाकारू नये. हमीपत्राद्वारे त्यांना प्रवेश द्यावा, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune pimpri chinchwad 11th admissions cutoff for 2024 38890 students admitted in the first round pune print news ccp 14 css