पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलीचे दोरीने हात-पाय आणि ओढणीने तोंड बांधून 29 वर्षीय नराधम आरोपीने बलात्कार केल्याचं भोसरी पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे मजुरीचं काम करतात. ते कामावर गेल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली आणि राहत्या घराच्या टेरेसवर बोलवले. त्यानंतर, पीडित मुलीचे तोंड ओढणीने बांधून आणि दोरीने हातपाय बांधून मुलीवर बलात्कार करण्यात आला, असं पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
आणखी वाचा- पिंपरीतील बेपत्ता उद्योजकाच्या हत्येने खळबळ; महाडच्या सावित्री नदीत आढळला मृतदेह
29 वर्षीय आरोपी आणि पीडित हे दोघे शेजारी राहण्यास आहेत. संबंधित घटनेची माहिती पीडित मुलीने आई वडिलांना दिल्यानंतर घटना उघडकीस आली, असे भोसरी पोलिसांनी सांगितले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित ओळखीचे असून यातूनच ही गंभीर घटना घडली असल्याचं पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी माहिती दिली आहे.