पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी उद्या (२७ जून) जाहीर होणार आहे. यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार असून, पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. आतापर्यंत कोटा प्रवेशाअंतर्गत ३ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ३४३ महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजार २६५ जागा उपलब्ध आहेत. त्यातील ९३ हजार ३५६ जागा केंद्रीय प्रवेशांसाठी (कॅप), तर २६ हजार ९०९ जागा कोटा प्रवेशांसाठी आहेत. केंद्रीय प्रवेशांसाठी ७० हजार २८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरून पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. त्यात एकूण ७० हजार ३६७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या यादीवरील आक्षेप, हरकती, दुरुस्ती प्रक्रिया करून आता पहिल्या फेरीच्या प्रवेशांसाठीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादीसह महाविद्यालयांचे पात्रतागुणही पाहता येणार आहेत.
हेही वाचा : देशात यंदा कापूस उत्पादनात घट? केंद्रीय कापूस उत्पादन आणि वापर समितीचा अंदाज
पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय वगळता अन्य पसंतीक्रमावरील महाविद्यालय मिळाल्यास आणि तेथे प्रवेश घ्यायचा नसल्यास विद्यार्थी पुढील फेरीसाठी थांबू शकतात. विद्यार्थ्याला त्याच्या लॉग इनद्वारे प्रवेश निश्चित करणे, नाकारणे किंवा रद्द करणे असे पर्याय निवडता येणार आहेत. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, संस्थाअंतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्यांक कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ३ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.