पुणे : पीएमपीच्या ताफ्यातील विजेवर धावणाऱ्या (इलेक्ट्रिक बस- ई-बस) गाड्यांची संख्या वाढत असल्याने आता ई-डेपोंची संख्या वाढविण्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्यानुसार चऱ्होली येथे डेपोचे काम सुरू झाले असून निगडी येथे सर्वात मोठा डेपो पीएमपीकडून विकसित केला जाणार आहे.
पर्यावरणपूरक आणि सक्षम वाहतुकीसाठी विजेवर धावणाऱ्या गाड्या पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या फेम योजनेतून पाचशे गाड्या घेण्याचे नियोजित आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात तीनशे गाड्या पीएमपीला प्राप्त झाल्या आहेत. पीएमपीकडून सध्या विविध मार्गांवर ३०८ ई-बस च्या माध्यमातून वातानूकुलित सेवा दिली जात आहे. विजेवर धावणाऱ्या गाड्यांसाठी भेकराईनगर, भक्ती-शक्ती, बाणेर, वाघोली आणि पुणे रेल्वे स्थानक येथे आगार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे रेल्वे स्थानक आगाराचे उद्घाटन येत्या काही दिवसांत होणार असून चऱ्होली येथे नव्याने आगार विकसीत करण्यात येत आहेत. या आगारातून ७० गाड्या सोडण्याचे प्रस्तावित असून निगडी येथेही सर्वाधिक मोठे आगार विकसित केले जाणार आहे.
विजेवर धावणाऱ्या गाड्यांसाठी या आगारांना सध्या अपुरा वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे बाणेर, वाघोली आणि पुणे रेल्वे स्थानक आगारातून क्षमतेपेक्षा कमी ई-बसचे चार्जिंग होत आहे.