पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस स्थानकांमध्ये चऱ्होली आणि माण येथे नवीन ई- बस स्थानके सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन बस स्थानकांचा फायदा होणार आहे. आज (२५ एप्रिल) दुपारी साडेचार वाजता दोन्ही बस स्थानकांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

शहरी वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने चऱ्होली आणि माण या ठिकाणी दोन ई-बस स्थानक उभारण्याचे नियोजन केले. चऱ्होली येथे ६० बस धावणार आहेत. या ई-स्थानकांमुळे आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली परिसरातील प्रवाशांना सेवा मिळणार आहे. हवाई प्रवाशांना विमानतळावर जाण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माण येथून ३२ बसचे नियोजन करण्यात आले आहे.

वेगाने वाढणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये सेवा कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि सुलभ दळणवळण यंत्रणा सुरू करण्याच्या उद्देशाने या ई-बस स्थानकांचा उपयोग होणार असल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आता नऊ ई-बस स्थानके

‘पीएमपी’ची हिंजवडी, कात्रज, बाणेर-सूस रस्ता, भोसरी, पुलगेट, डेक्कन जिमखाना आणि हिंजवडी फेज २ या सात ठिकाणी ई बस स्थानके आहेत. त्यामध्ये चऱ्होली आणि माण येथील या दोन स्थानकांची भर पडणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पीएमआरडीएच्या हद्दीत ‘पीएमपी’ची सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. नवीन ई-बस स्थानकांमुळे प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे. दीपा मुधोळ-मुंडे, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल