पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीबरोबरचे प्रवाशांचे नाते आणखी दृढ व्हावे आणि प्रवाशांशी सुसंवाद वाढावा, यासाठी ‘मी पीएमपीचा प्रवासी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत ही स्पर्धा होईल.
उत्कृष्ट लेख, कविता, छायाचित्र आणि ध्वनीचित्रफीत या प्रकारात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या चारही गटातील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यास बक्षीस म्हणून एक वर्ष सर्व मार्गांसाठी विनामूल्य प्रवासाची सुविधा देण्यात येणार असून द्वितीय क्रमांसाठी सर्व मार्गांवर सहा महिने विनामूल्य प्रवास आणि तृतीय क्रमांसाठी सर्व मार्गांवर तीन महिने विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार आहे. पीएमपीने दिलेल्या pmplcontest@gmail.com या संकेतस्थळावर तसेच ९०११०३८१४९ या व्हॅाटसॲप क्रमांकावर लेख, कविता, छायाचित्र आणि ध्वनीचित्रफीत पाठविता येणार आहे. ऑनालाइन व्हॅाटसॲप क्यूआर कोड त्यासाठी असून तो स्कॅन करावा लागणार आहे. ऑफलाइन पद्धतीने स्पर्धेत सहभाग नोंदविता येणार असून पीएमपीच्या सर्व मुख्य स्थानकांवरील पेट्यांमध्ये प्रवेशिका दाखल करता येणार आहे. शाळा तसेच महाविद्यालयीने विद्यार्थी तसेच संस्थेचे प्रतिनिधी एकत्रित सहभाग नोंदवू शकणार आहेत.