पुणे : प्रस्तावित नवीन पुरंदर विमानतळ परिसरात रस्त्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ६३६ कोटी, रांजणगाव ते हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील सिमेंट रस्त्यांसाठी २०३ कोटी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘अर्बन ग्रोथ सेंटर’साठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी १ हजार ५२६ कोटी, येरवडा ते कात्रज ट्वीन टनेल भुयारी मार्ग, पीएमपीसाठी पाचशे गाड्यांची खरेदीसाठी अडीचशे कोटी अशा विविध प्रकल्पांचा समावेश असलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अर्थसंकल्पास बुधवारी मान्यता देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री, ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत आगामी आर्थिक वर्षासाठीचा (२०२५-२६) ४ हजार ५०३ कोटींचा अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात शहर आणि ग्रामीण भागातील दळणवळण गतिमान करण्यासाठी भर देण्यात आला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे उपस्थित होते.

नियोजित वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड), पुणे-सातारा आणि पुणे-नगर रस्त्यापासून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला ‘कनेक्टिव्हिटी’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठीही भरीव तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ‘पीएमआरडीए’ची विकास योजना (डीपी) तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे दोन टप्प्यात आराखडा करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली. पहिल्या टप्प्यात योजनेतील रस्ते, मलनि:स्सारण, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, स्मशानभूमी, दफनभूमी आदींचा समावेश असून, उर्वरित दुसऱ्या टप्प्यात अन्य सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत प्रकल्प कार्यान्वित करण्याचेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात रस्त्यांचे जाळेही ‘पीएमआरडीए’कडून विकसीत केले जाणार आहे. त्यासाठी ६३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, रांजणगाव आणि हिंजवडी येथील औद्योगिक क्षेत्रात सिमेंटचे रस्ते करण्यात येणार आहेत. त्यासाठी २०३ कोटी देण्यात येणार आहेत. अर्बन ग्रोथ सेंटरसाठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल १ हजार ५२६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

येरवडा-कात्रज ट्वीन टनेल भुयारी मार्ग

पुणे शहरात दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार करावा. हा भुयारी मार्ग ‘ट्वीन टनेल’ पद्धतीचा असावा. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे आदेशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. नगर रस्ता परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे प्रथमच ही महत्त्वाकांक्षी नवी संकल्पना अर्थसकंल्पात मंजूर करण्यात आली आहे. याबाबतचा आराखडा लवकरच पीएमआरडीकडून केला जाणार आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावाही केला जात आहे.

मेट्राेच्या उड्डाणपुलासाठी जागा देण्याची सूचना

राजभवन आवारातील जागा मेट्रोच्या उड्डाणपुलासाठी देण्याची कारवाई तातडीने पूर्ण करावी, अशी सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. नवीन शहर करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करावे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करीत पायाभूत सुविधांचा अंतर्भाव करावा. प्राधिकरणाने पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. प्राधिकरणांनी अद्ययावत संकेतस्थळ सुरू करावे. संकेतस्थळावरून जास्तीत जास्त ऑनलाइन सुविधा देण्यात याव्यात. विकास शुल्क नागरिकांना परवडेल अशा पद्धतीने ठेवावे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.