पुणे : शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला असून, ३० दिवसांत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांत पुढील ३० दिवसांत राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली दुकाने, गाळे, बांधकामे तसेच अन्य काही तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधकामांवर विविध विभागांकडून संयुक्त कारवाई होणार आहे. मार्च महिन्यापासून या कारवाईला प्रारंभ होणार आहे.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये ३० दिवसांत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पीएमआरडीएच्या सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी-पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख विभागाच्या आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम आदी या वेळी उपस्थित होते.
कोणत्या रस्त्यांवर कारवाई होणार?
पुणे सोलापूर रस्त्यावरील हडपसर ते यवत आणि उरुळीकांचन ते शिंदवणे, नाशिक रस्त्यावरील राजगुरूनगर परिसर, चांदणी चौक ते पौड येथील अतिक्रमणांवर ३ मार्च ते १० मार्च या दरम्यान कारवाई होणार आहे. पुणे सातारा रस्त्यावरील नवले पूल ते सारोळे, सूस रस्ता, हडपसर (शेवाळेवाडी) ते दिवेघाट, नवलाख उंब्रे ते चाकण, हिंजवडी परिसर ते माण, तळेगाव-चाकण-शिक्रापूर येथील अतिक्रमणांवर १० मार्च ते २० मार्च या कालावाधीत कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व विभाग संयुक्त कारवाई करणार असून, त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. संबंधित क्षेत्रातील महामार्ग आणि राज्यमार्ग रस्त्यालगतची दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी आणि अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून टाकावीत.
डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए
अतिक्रमणे पुन्हा झाली, तर काय?
अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर संबंधित ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यासाठी प्रशासनाकडून काही केले जात नसल्याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे पुन्हा काही दिवसांतच त्याच ठिकाणी अतिक्रमणे उभी राहतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ कालबद्ध कृतिकार्यक्रम न राबविता ही समस्या कायमस्वरुपी सोडविण्याच्या नागरिकांच्या मागणीचा विचार व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.