प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळा येथे एका गँगने पर्यटक अल्पवयीन मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यात १० गुन्हेगारांच्या टोळीचा सहभाग असल्याचंही समोर आलं आहे. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. यातील २ आरोपी अल्पवयीन आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोपींनी पर्यटक मुलींचं लोणावळा रेल्वे स्टेशनवरून अपहरण केलं. यानंतर एका ठिकाणी त्यांना डांबून ठेवत मारहाण केली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी या गँगने अपहरण केलेल्या एका मुलाचीही सुटका केली. तसेच या टोळीतील १० पैकी ४ जणांना अटक केली.

अपहरण आणि बलात्काराची घटना क्रमांक एक

लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचे दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अपहरण केले. हनुमान टेकडी परिसरातील एका घरात मुलीला डांबून ठेवण्यात आले. मुलीला साखळीने बांधून ठेवण्यात आले, तसेच तिला मारहाण करण्यात आली. आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बेताब आनंद पवार, मंदा बेताब पवार, संजना बबलू पवार, बबलू पवार, अर्चना बेताब पवार, किरण बेताब पवार, मोनिका बेताब पवार, राज सिद्धेश्वर शिंदे, करीना राज शिंदे (सर्व रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अपहरण आणि बलात्काराची घटना क्रमांक दोन

लोणावळा शहर परिसरात घडलेल्या आणखी एका घटनेत उत्तरप्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. पीडित मुलगी लोणावळा रेल्वे स्थानक परिसरात थांबली होती. त्यावेळी तिला पळवून नेण्यात आले. तिला मारहाण करुन अत्याचार करण्यात आले. तिचा मोबाइल संच आरोपींनी ताब्यात घेतला. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार करीना राज शिंदे, मंदाकिनी बेताब पवार, संजना बबलू ठाकूर, बबलू पवार, राज सिद्धेश्वर पवार, बेताब आनंद पवार, ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा उपविभागाचे विभागीय अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत.

हेही वाचा : लोणावळा रेल्वे स्थानक परिसरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन अत्याचार

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी राज सिद्धेश्वर शिंदे आणि ज्ञानेश्वर रामभाऊ लोकरे या दोघांना स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तसेच आरोपींपैकी दोघे अल्पवयीन आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन येरवडा येथील सुधारणा गृहात पाठवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींच्या नावे आधीही काही गुन्ह्यांची नोंद आहे. पोलीस उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police action against criminals gang who kidnap and rape girl tourist pbs