पुणे : पुणे शहर आणि कुरकुंभ पाठोपाठ पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी नवी दिल्लीत छापा टाकून तब्बल ८०० कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. पुणे पोलिसांनी गेल्या २४ तासांत सुमारे दोन हजार कोटी रुपये किमतीचे ९५० किलो अमली पदार्थ जप्त केले. देशातील अमली पदार्थ तस्करीतील बडे तस्कर सामील असून त्यांच्या शोधासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालयाच्या (एनसीबी) मदतीने संपूर्ण देशभरात तपास सुरू करण्यात आला आहे.
पुणे शहरात रविवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पथकाने तीनजणांना अटक करून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर छापा टाकत एक हजार कोटी रुपये किमतीचे ५०० किलो एमडी जप्त केले. विश्रांतवाडीतून १०० कोटी रुपये किमतीचे ५० किलो एमडी जप्त करण्यात आले.
हेही वाचा – पिंपरी : महापालिकेची आर्थिक स्थिती कशी आहे? नेमक्या बचत ठेवी किती? आयुक्त म्हणाले…
कुरकुंभ येथील कंपनीत तयार केलेला कच्चा माल पुण्यातून मीरा भाईंदर, मुंबई, पश्चिम बंगाल आणि नेपाळमार्गे परदेशात पाठविण्यात येत असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने दिल्लीतील कंपनीवर छापा टाकला. तेथून ८०० कोटी रुपये किमतीचे ४०० किलो एमडी जप्त करण्यात आले. पोलिसांनी दोनजणांना ताब्यात घेतले आहे.