भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १० लाख ७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यात सोने,चांदी दुचाकी,चारचाकी गाड्यांचा समावेश आहे. पोलिसांनी एकूण १२ गुन्हे उघडकीस आणले असून याप्रकरणी अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी (३३) आणि सचिन केरुनाथ पारधे (३१)अशी वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात एका अल्पवयीन आरोपीचाही सहभाग आहे. आरोपी संगतसिंग अजमेरसिंग कल्याणी याच्यावर दरोडा,घरफोडी, चोरी प्रकरणी त्याचा शोध सुरू होता. दोन्ही मिळून एकूण ४२ गुन्हे त्याच्यावर आहेत. आरोपी संगतसिंग हा भोसरी बस स्टॉपवर येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन केरुनाथ पारधे याला अटक करून त्याच्याकडून सात दुचाकी आणि १ मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पारधे विरोधातील चार गुन्हे उघड झाले असून तीन वाहनांच्या चोरीबाबत तपास सुरू आहे. त्याचबरोबर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे दोन चारचाकी गाड्या सापडल्या. एकूण १० लाख ७ हजार रुपयांचा ऐवज भोसरी पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी झोन १ च्या पोलीस उप-आयुक्त,भोसरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे याच्या पथकाने केली आहे.