पुण्यात अपहरण करून भंगार व्यवसायिकाला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट ३ ने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई केली. म्हाळुंगे येथील परिसरातून २८ वर्षीय भंगार व्यवसायिकाचं ४ जणांनी अपहरण केलं. पैशांची मागणी करत मोटारीतून डोंगराळ परिसरातून फिरवलं. पैसे दे, अन्यथा तुझी बोटं कापू, तुला जीवे मारू अशा धमक्या देत बेदम मारहाण करण्यात आली. 

आरोपींनी अपहरण केलेल्या पीडिताच्या बँक खात्यातून गुगल पेचा वापर करून एकूण दीड लाख रुपये काढले आणि त्यानंतर त्याला सोडून दिलं. यानंतर अपहरण झालेल्या भंगार व्यवसायिकाने म्हाळुंगे पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. याप्रकरणी सरदार अकबर सय्यद, शरद ज्ञानेश्वर मोरे, रामदास मारुती साळुंखे, प्रभू शिवलिंग कोळी या आरोपींना अटक करण्यात आलंय.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी म्हाळुंगे येथील वासुली फाटा येथून २८ वर्षीय भंगार व्यवसायिकाचे अपहरण केले होते. अगोदर आरोपींनी भंगार व्यवसायिकाला आम्हाला भंगार विकायचे आहे, ते काही अंतरावर असून तुम्ही सोबत या सांगितले. तो विश्वास ठेवून आरोपींसोबत गेला, मात्र झालं वेगळंच. त्याला मोटारीत बसल्यानंतर तुझी बोटं कापू, तुला जीवे मारू अशा धमक्या देऊन बेदम मारहाण करत पैशांची मागणी करण्यात आली.

काही तास व्यवसायिकाला मोटारीतून डोंगराळ परिसरात फिरवण्यात आलं. त्याच्या बँक खात्यातून, गुगल पेद्वारे दीड लाख रुपये काढून घेतले आणि त्याला ठराविक अंतरावर सोडून देण्यात आलं. जखमी अवस्थेत व्यवसायिक म्हाळुंगे पोलिसांपर्यंत गेला त्याने तक्रार दिली. दरम्यान, आरोपी हे आंबेठाण गावातून जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ मिळाली. त्यानुसार, गावात वाहतूक कोंडी करून सापळा रचत आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली.

खुनाच्या प्रकरणात नुकतेच तुरुंगातून सुटले आणि…

आरोपी शरद ज्ञानेश्वर मोरे आणि रामदास मारुती साळुंखे हे दोघे जण काही महिन्यांपूर्वी खुनाच्या प्रकरणातून जेलमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची झाली होती. त्यामुळे त्यांनी परराज्यातील भंगार व्यवसायिकांना हेरण्यास सुरुवात केली. ते भंगार द्यायचं आहे असं सांगत अपहरण करत आणि मारहाण करून पैसे लुटायचे.

हेही वाचा : डॉ. दाभोलकर हत्या खटल्यात आठ वर्षांनी पहिली साक्ष

याआधी अशाच प्रकारे दोन अपहरणांचे गुन्हे?

या अगोदर आरोपींनी अशाच प्रकारे दोघांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत पैसे काढून घेतले होते. या प्रकरणी देखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना त्याची सवय झाली होती. मात्र, पोलिसांनी अचूक टायमिंग साधत आरोपीला अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले यांच्या पथकाने केली आहे. 

Story img Loader