पुणे : कर्ज फेडण्यासाठी एकाने दुचाकी चोरून विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. समर्थ पोलिसांनी दुचाकी चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या दुचाकींची विक्री चोरट्याने दौंड तालुक्यात केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. अरविंद मोतीराम चव्हाण (वय ३९, रा. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. चव्हाणने सोमवार पेठेतील शाहू उद्यान परिसरातून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरली होती. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. पोलिसांनी चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी शरद घोरपडे सोमवार पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांनी संशयित चोरटा चव्हाणला पाहिले. त्यांनी चव्हाणला थांबवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला. चव्हाण पोलिसांना पाहताच पसार झाला.

हेही वाचा…सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तारांकित ‘कन्व्हेन्शन सेंटर’चा घाट

पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. चव्हाणला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कर्जाची परतफेड करण्यासाठी पुणे स्टेशन, सोमवार पेठ परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरलेल्या दुचाकींची दौंड तालुक्यात विक्री केल्याचे त्याने सांगितले. त्याने बंडगार्डन आणि समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, उपनिरीक्षक सुनील रणदिवे, जालिंदर फडतरे, रोहिदास वाघेरे, रवींद्र ओैचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, रहीम शेख, कल्याण बोराडे, अविनाश दरवडे, अर्जुन कुडाळकर यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrest bike thief recover ten stolen two wheelers thief sold bikes to repay loan pune print news rbk 25 psg