नगर रस्त्यावरील वाघोली येथील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी संगणक अभियंत्याच्या खून झाल्याचे उघडकीस आले होते. मात्र पुणे पोलिसांनी केवळ चोवीस तासांतच या मारेकऱ्याचा लावला असून, मोटारचालकाने केवळ तीन हजार रुपयांसाठी संगणक अभियंता तरुणाचा गळा चिरून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोणीकंद पोलिसांनी आरोपी मोटारचालकास अटक केली आहे. भगवान केंद्रे (वय २३, रा. परतापूर, ता. कळंब, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. गौरव सुरेश उरावी (वय ३५, रा. खराडी, मूळ रा. शिवाजीनगर, अमरावती) असे खून झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : कोरेगाव पार्कमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; थायलंडमधील तरुणी ताब्यात

शनिवारी दुपारी लोहगाव-भावडी रस्त्यावरील मल्हारी डोंगराच्या पायथ्याशी रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. डोंगराच्या पायथ्याजवळ गौरवची दुचाकी सापडली होती. दुचाकी क्रमांकावरुन पोलिसांनी शोध घेऊन ओळख पटविली होती. खराडी येथील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत गौरव नोकरी करत होता. खराडी भागातील एका सोसायटीत तो मित्रांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास गौरव जेवायला जातो, असे मित्रांना सांगून बाहेर पडला. मात्र, तो रात्री उशीरापर्यंत परतला नाही. शनिवारी दुपारी त्याचा खून झाल्याचा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारूती पाटील आणि पथकाने तपास सुरू केला.

तपासात गौरवचा खून आरोपी भगवान केंद्रे याने केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलिसांच्या पथकाने त्याला कळंब तालुक्यातील परतापूर येथून पकडले. भगवान पुण्यात ॲप आधारित मोटार चालवत होता. गौरवने ॲपवरुन मोटारीची दोन वेळा नोंदणी केली होती. गौरव आणि भगवान यांची ओळख झाली होती. गौरवने मोटारचालक भगवान याचा मोबाइल क्रमांक घेतलेला होता. गौरव भगवानला तीन हजार रुपये देणे लागत होता. गौरवने वेळेवर पैसे दिले नसल्याने भगवान त्याच्यावर चिडला होता. शुक्रवारी रात्री भगवानने त्याला बोलावून घेतले. भगवान त्याचा साथीदार आणि गौरव मोटारीतून वाघोलीतील डोंगराच्या पायथ्याशी गेले. तेथे त्यांच्यात वादावादी झाली. भगवान आणि साथीदाराने गौरवच्या गळ्यावर शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrest computer engineer killer in just 24 hours pune print news rbk 25 zws
First published on: 14-05-2023 at 16:09 IST