पुणे : संक्रातीत पतंगबाजी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धोकादायक नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून सोळाशे रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. संक्रातीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विक्री करण्यात येते. नायलॉन मांजामुळे नागरिकांना गंभीर दुखापतीच्या घटना घडल्या आहेत. नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून. पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पथक विश्रांतवाडी भागात गस्त घालत होते. धानोरी भागात एक महिला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विनोद महाजन आणि नागेशसिंग कुवर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने धानोरीतील मुंजाबा वस्ती भागात असलेल्या मैत्री पार्क परिसरात छापा टाकला.
हेही वाचा : पुणे : कर्वेनगर भागातील बंगल्यात चोरी
नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून एक हजार ६०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. तिच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि पथकाने ही कामागिरी केली.