लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: एटीएममध्ये स्फोट घडवून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. चोरट्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत परिसरात स्फोट घडवून एटीएममधील रोकड चोरीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
विशाल छबू पल्हारे (वय २०, रा. हांगेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. नगर), आदित्य प्रदीप रोकडे (वय २०, रा. चिंचणी, ता. शिरुर, जि. पुणे), अनिकेत संजय शिंदे (वय २०, रा. बोरी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी चोरट्यांचा साथीदार आदित्य खोमणे (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… “लहान मुलांना गुप्त अवयवांविषयी विचारणं हा डाव्या विचारसरणीच्या…”, मोहन भागवत यांची बोचरी टीका
यवत परिसरातील पारगाव येथील एका बँकेच्या एटीएमध्ये स्फोट घडवून रोकड चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. एटीएममधील रोकड बाहेर न पडल्याने चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात चोरी, तसेच स्फोटके अधिनियम कायदा १९०८ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांना सापळा लावून पकडण्यात आले.
हेही वाचा… लोणावळा: सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांचा जुगार अड्ड्यावर थेट छापा; अनेकांचे धाबे दणाणले!
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक हेमंत शेडगे, राहुल गावडे, गणेश जगदाळे, तुषार पंधारे, हवालदार सचिन घाडगे, जनार्दन शेळके, आसिफ शेख, योगेश नागरगोजे, राजू मोमीन, अतुल डेरे आदींनी ही कारवाई केली.