पुणे : शहराच्या मध्यभागात मोबाइल चोरीचे गुन्हे करणाऱ्या तिघांना खडक पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १२ मोबाइल संच जप्त करण्यात आले असून, ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. गोविंद सुभाष सुर्यवंशी (वय १८, रा. कोंढवा), अजय माणिक रसाळ (वय २५, रा. कोंढवा), राहूल महादेव गेजगे (वय १८, रा. येवलेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहराच्या मध्यभागात मोबाइल चोरीचा गुन्हा घडला होता. याबाबतची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल होती. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी खडक पोलिसांची पथके हद्दीत गस्तीवर होते.

हेही वाचा >>> मोटारीचा ‘जॅमर’ काढण्यासाठी मागितली लाच; सहायक फौजदारासह, वॉर्डनवर गुन्हा

साठे कॉलनी भागात संशयित थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानूसार सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस कर्मचारी हर्षल दुडम, किरण ठवरे, शेखर खराडे, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे यांच्यासह पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोबाइलबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवी उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी मागील दोन महिन्यांपासून खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिली. पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ६४ हजारांचे १२ मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.